बहिणीशी असलेल्या एकतर्फी प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या भावाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री शहरात ही घटना घडली. या वेळी झालेल्या झटापटीत अन्य तिघे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी सहा हल्लेखोरांना अटक केली असून काही जण पसार झाले आहेत.
सूरज कैलास ढोले असे या दुर्दैवी घटनेत बळी गेलेल्या तरुणाचे नाव आहे. नीलेश रमेश ढोले, योगेश रमेश ढोले व सागर शंकर ढोले अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विनायक गणपत भोर, सागर शंकर ढोले, मुकुंद भरत ढोले, प्रसाद भरत ढोले, ज्ञानेश्वर मच्छिंद्र ढोले, वैभव गोरक्ष ढोले, राजेंद्र जंबुकर अशी आरोपींची नावे आहेत. वरील सर्व जण शहराला खेटून असलेल्या ढोलेवाडी येथील राहणारे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मृत सूरज याच्या बहिणीवर आरोपी ज्ञानेश्वर ढोले याचे एकतर्फी प्रेम होते. सूरजने आठ दिवसांपूर्वीच याबाबत ज्ञानेश्वरला समजावून सांगत प्रकरण मिटवले होते. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी सूरज व त्याचे वरील दोघे मित्र दुचाकीवरून जात असताना आरोपी ज्ञानेश्वर त्यांना गावातील शनिमंदिराजवळ भेटला. तेथे त्यांच्यात जोरदार वाद झाले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांचे वाद सोडवून तेथून काढून दिले. त्यानंतर आरोपींनी रात्री नऊच्या सुमारास सूरज यास अकोले रस्त्यावरच्या पेटीट विद्यालयाजवळ बोलावले. सूरज आपल्या वरील दोघा मित्रांसह तेथे गेला. तेथे काही चर्चा करण्याऐवजी ज्ञानेश्वरचा मित्र असलेल्या विनायक भोर याने सूरजवर चाकूने हल्ला चढवला. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगातून सूरजला वाचविण्यासाठी त्याचे मित्र नीलेश व योगेश मध्ये पडले. त्यांच्यावरही सुऱ्याने सपासप वार करण्यात आले. त्यानंतर सर्व आरोपी तेथून पसार झाले. आजूबाजूच्या लोकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी अत्यवस्थ असलेल्या सूरज यास तातडीने पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले, मात्र प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्याम सोमवंशी, उपनिरीक्षक अन्सार शेख यांचे पथक घटनास्थळी पोचले. तातडीने तपास करत मुख्य आरोपी भोर, प्रसाद ढोले यांना ताब्यात घेतले. पसार झालेल्या अन्य आरोपींपैकी चौघांना गुरुवारी ताब्यात घेण्यात आले. नीलेश ढोले याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.