रस्ता रुंदीकरणात केबल तुटल्याचे कारण; बँका, टपाल विभागाच्या कामकाजांवर परिणाम

वाडा शहरातील मुख्य बाजारपेठेमधील रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामांत बीएसएनएलच्या केबल तुटल्याने वाडा शहरातील बीएसएनएलची सेवा ठप्प झाली आहे. यामुळे दूरध्वनीसह इंटरनेट सेवा बंद झाल्याने त्याचा परिणाम बँका, टपाल विभागाच्या कामकाजांवर झाला आहे.

वाडा-नाशिक हा राज्य महामार्ग वाडा शहरातील मुख्य बाजारपेठेतून जातो. या मार्गावर नेहमीच होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. मात्र या रस्त्याच्या कडेला जमिनीखाली बीएसएनएल आणि काही खासगी कंपन्यांच्या केबल टाकण्यात आल्या आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या कामात खोदकाम करताना या केबल उखडल्या गेल्या असून काही ठिकाणी त्या तुटल्या आहेत. त्याचा परिणाम बीएसएनएलच्या दूरध्वनी व इंटरनेट सेवांवर झाला आहे. या सेवा बंद असल्याने वाडा शहरातील शासकीय व सहकारी बँका, टपाल विभागाचे कार्यालय यांची इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. त्याचे व्यवहार ठप्प झाल्याने शहरातील काही एटीएम केंद्रही बंद झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी परवड होत असल्याचे दिसून येत आहे.

रस्ता रुंदीकरण होत असल्याने या रस्त्याच्या कडेला जमिनीत असलेल्या केबल बाहेर काढण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या. पण त्याची दखल न घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. – प्रकाश पातकर, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वाडा.

 

रस्ता रुंदीकरणाच्या कामात तुटलेल्या केबल खासगी कंपन्यांनी तात्काळ जोडून सेवा पूर्ववत सुरू केली. मात्र बीएसएनएलने वेळीच दखल न घेतल्याने त्याचा त्रास ग्राहाकांना होत आहे. – विशाल मुकणे, स्थानिक रहिवासी