पर्यावरण नष्ट करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे अस्तित्व संपुष्टात येण्याचा धोका असलेल्या माळढोक पक्ष्यांची गणना पूर्वी वर्षांतून एकदाच होत असे. परंतु, यंदाच्या वर्षी ही गणना तब्बल नऊ वेळा होणार आहे. त्यामुळे माळढोकची संख्या नेमकी किती, याची निश्चिती करता येऊ शकेल.
दुर्मीळातील दुर्मीळ स्थितीत समाविष्ट असलेल्या माळढोक पक्ष्याचे जतन व संवर्धनासाठी वनविभागाने चालविल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून यंदाच्या वर्षी दर तीन महिन्यांचा कालावधी ठरवून प्रत्येक महिन्यात तीन दिवस माळढोकची गणना केली जाणार आहे. त्याची सुरुवात येत्या जुलै ते ऑक्टोबर दरम्यान प्रत्येक महिन्यात तीन दिवस गणना होणार आहे. एका दिवसात होणाऱ्या गणनेमुळे पक्ष्याची संख्या निश्चित करता येणे अशक्य आहे. त्यामुळे सलग तीन दिवस गणना करण्यात येणार आहे. यात एकाच पक्ष्याची दुबार गणना होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.
वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी पुण्यात वनविभागातील वरिष्ठ अधिकारी, वन्यजीव संवर्धनाचे कार्य करणाऱ्या संस्था व मानद वन्यजीव रक्षकांच्या उपस्थितीत चर्चा करून घेतलेल्या निर्णयानुसार येत्या जुलैमध्ये शेवटच्या आठवडय़ात माळढोकची गणना होणार आहे. नंतर ऑगस्टमध्ये तिसऱ्या आठवडय़ात तर सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये पुन्हा गणना केली जाणार आहे. माळढोकच्या गणनेमुळे पक्ष्याची संख्या निश्चिती झाल्यास माळढोक कृत्रिम प्रजनन केंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करता येऊ शकेल. दीड वर्षांपूर्वी माळढोक कृत्रिम प्रजनन केंद्राच्या उभारणीसाठी शासनाने दहा कोटींचा विशेष निधी मंजूर केला होता.
गेल्या वर्षी झालेल्या गणनेनुसार नान्नज येथे केवळ ३ माळढोक आढळून आले होते. यापूर्वी २००८ साली या भागात २४ माळढोक आढळून आले होते. त्यात ७ नर तर १३ मादींचा समावेश होता.