फुलपाखरू म्हटलं की, अगदी थोरामोठय़ांपासून लहान मुलांपर्यंत आपलंसं करून टाकणारा सजीव! जैवविविधतेतील या महत्त्वाच्या घटकाविषयी, त्यांच्या सौंदर्याबद्दल सगळ्यांना विलक्षण आकर्षण असते. मग कुणी त्याला आपल्या कॅमेऱ्यात किंवा मोबाईलमध्ये टिपण्यासाठी किंवा कुणी छोटी मुलं त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागून धावताना दिसतात. याच फुलपाखरांच्या रंगीबेरंगी दुनियेचा आढावा घेण्यासाठी, त्यांचे अंतरंग जाणून घेण्यासाठी आंबोलीत २१, २२, २३ ऑक्टोबर रोजी फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी राधानगरी येथे बायसन नेचर क्लब या राज्यस्तरीय फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन केले होते. त्या वेळी राज्यभरातील दीडशेहून अधिक निसर्गप्रेमी अभ्यासकांनी या महोत्सवात सहभाग नोंदवला होता. त्याच वेळी या महोत्सवाचे आयोजन आंबोलीत करण्याचे ठरवले गेले. त्या अनुषंगाने आंबोलीत निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव या ३ दिवसांत आयोजित करण्यात आला आहे.

जैव विविधतेच्या दृष्टीने संपन्न असलेल्या आंबोलीत आतापर्यंत २०४ हून अधिक प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले यांनी केली आहे. ही संख्या आज महाराष्ट्रात सर्वात अधिक आहे व त्यात अनेक दुर्मीळ प्रजातींचा समावेश आहे. यात दक्षिणेत सापडणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजातींची पहिल्यांदाच महाराष्ट्रात नोंद आंबोलीतून झाली आहे.

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
guru asta 2024
१४ दिवसांनी गुरु होणार अस्त! ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; नोकरीपासून प्रेमापर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते यश
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती

(ब्ल्यू नवाब) (डार्क वाँनडरर), (मलबार रेवन), (मेडम ब्राऊन),  (पेल ग्रीन औलेट), (सिल्वरस्ट्रिक आकेशिया ब्ल्यू), यासारख्या फुलपाखरांच्या यात समावेश आहे. हेमंत ओगले यांनी शंभरहून अधिक फुलपाखरांची जीवनचक्र अभ्यासली असून, त्यातून अनेक नवीन  (फुलपाखरांच्या सुरवंटांच्या खाद्य वनस्पती) पहिल्यांदाच आंबोलीतून नोंद झाली आहे. राज्य फुलपाखरू (ब्ल्यू मॉरमॉन) व सर्वात मोठे फुलपाखरू (सदर्न बर्डविंग) आंबोलीत मोठय़ा संख्येने आढळतात. फुलपाखरांबरोबर (एँटलस मॉथ), (मून मॉथ) सारख्या पतंगाच्या अनेक जाती इथे आढळतात.

ऑक्टोबर ते डिसेंबर व मार्च-एप्रिल या महिन्यात विशेषत: फुलपाखरांचा वावर जास्त असतो. त्या अनुषंगाने पर्यावरणपूरक पर्यटनाच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे एमएनसीसी संस्थेचे काका भिसे यांनी सांगितले.

या वर्षी महोत्सवाची मुख्य थीम फुलपाखरू संवर्धन व जनजागृती असा आहे, असे फारूक मेहतर यांनी सांगितले. या महोत्सवातील अभ्यास सत्रांमध्ये फुलपाखरू उद्यान निर्मितीबद्दल व त्यामागचे वनस्पतीशास्त्राची माहिती देण्यात येणार आहे, तसेच फुलपाखरू व पतंगांच्या जीवन, अधिवास, खाद्य व पर्यावरणबद्दल अभ्यास चर्चा होणार आहे.

या महोत्सवाच्या निमित्ताने आंबोलीतील लहान किटकांपासून मोठय़ा प्राण्यांबाबतीतील जैव विविधतेचे व पर्यावरण अधिवासाचे महत्त्व अधोरेखित होऊन त्याच्या संवर्धनास मदत होईल, अशी आशा संस्थेच्या साइली पलांडे-दातार यांनी व्यक्त केली. या महोत्सवातील आयोजनात सिंधुदुर्ग वनविभागाचा सहभाग निश्चित आशादायी आहे.

बेळवई उडपी येथील मोठय़ा व्यावसायिक फुलपाखरू उद्यानाचे संचालक, संमेलन शेट्टी व ओवळेकरवाडी येथील महाराष्ट्रातील पहिल्या फुलपाखरू उद्यानाचे निर्माते राजेंद्र ओवळेकर हे दोघे फुलपाखरू उद्याननिर्मितीबद्दल मार्गदर्शन करतील. गोव्याच्या फुलपाखरांच्या पुस्तकांचे लेखक व गोवा जैवविविधता मंडळाचे सदस्य, पराग रांगणेकर हे फुलपाखरांविषयीच्या विविध पैलूंवर बोलतील. प्रख्यात कीटक अभ्यासक डॉ. अमोल पटवर्धन कीटकांच्या वैशिष्टय़पूर्ण जगाची माहिती देतील. कोल्हापूर वन्यजीव विभागाचे मानद वन्यजीव रक्षक, रमण कुलकर्णी संवेदनशीलपणे फुलपाखरांचे छायाचित्रण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करतील. डॉ. मिलिंद भाकरे त्यांच्या फुलपाखरू अभ्यासांचे अनुभव व उद्यानाबद्दल माहिती देतील. ग्रीन गार्डसचे फारूक मेहतर व एमएनसीसीचे हेमंत ओगले फुलपाखराच्या परीसंस्था अन्न, अधिवास व संवर्धन अशा अनेक पैलूंवर व्याख्यानांद्वारे व प्रत्यक्ष भटकांतीतून प्रकाश टाकतील. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी होणाऱ्या या दुर्मीळ व्याख्यानांचा व फुलपाखरू निरीक्षणाचा सर्व निसर्गप्रेमींनी जरूर लाभ घ्यावा.

पहिल्या दिवशी स्थानिक शालेय विद्यार्थी, निसर्गप्रेमी अभ्यासक व पर्यटक छायाचित्रकार, स्थानिक पर्यटक व्यावसायिक यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या समारंभाला रिझव्‍‌र्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर व बीएनएचएसच्या उपाध्यक्ष उषा थोरात या प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या असून, जिल्ह्य़ाचे कलेक्टर व सीईओ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

बालकांची फुलपाखरू परेड, सुरवंटाचा नाच, वन्यप्राणी फॅशन शो, छायाचित्र प्रदर्शन असे कार्यक्रम पहिल्या दिवशी आयोजित केले आहे. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी फुलपाखरू, पतंगविषयक तज्ज्ञ अभ्यासक मार्गदर्शन करतील. पतंग व फुलपाखरांच्या जीवन चक्रावर दृक-श्राव्य कार्यक्रम होतील, तसेच फुलपाखरू उद्यान व मिनी गार्डन कसे बनविता येईल याविषयी माहिती देण्यात येईल. तिसऱ्या दिवशी जंगल भ्रमंती करून प्रत्यक्षात फुलपाखरू निरीक्षण व त्यांच्या जीवनचक्राविषयी माहिती दिली जाणार आहे.