धनगर, मराठा, मुस्लीम, लिंगायत आदी सर्व समाजाला आरक्षण देता येत नसेल, तर सर्वाचेच आरक्षण रद्द करा, अशी मागणी सातारचे राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

सोलापुरात शुक्रवारी आल्यानंतर खासदार छत्रपती खासदार उदयनराजे यांनी ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात येऊ न दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आरक्षणाच्या मुद्दय़ावर भाष्य करताना ते म्हणाले, की प्रत्येक धर्मात आर्थिकदृष्टय़ा मागासलेले नागरिक आहेत, त्या सर्वाना ‘सर्वधर्मसमभाव’च्या तत्त्वावर आरक्षण मिळाले पाहिजे. धनगर, मराठा, मुस्लीम, लिंगायत समाजाकडून आरक्षण मिळण्यासाठी सातत्याने आंदोलन होत आहे. शासनाकडून प्रत्येकाला आरक्षणाचे गाजर दाखविले जाते. प्रत्यक्षात आरक्षण पदरात पडत नाही. त्यामुळे आरक्षण मुद्दय़ावर जातीजातीमध्ये भांडणे होऊ  लागली आहेत. त्यामुळे लोकशाहीच संपुष्टात येण्याची भीती वाटते.

या प्रत्येकच गरजू समाजाला जर वेळेत आरक्षण लागू होणार नसेल, तर अन्य समाजांसाठी असलेले आरक्षण तरी कशाला ठेवायचे? सर्वच आरक्षणे रद्द करा, अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले. सर्वाना आरक्षण देता येत नसेल, तर उगाच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ न ‘सर्वधर्मसमभाव’ची भाषा बोलू नका, असेही त्यांनी सुनावले.