आमदार श्रीकांत देशपांडे यांची मागणी

अमरावती : खासगी शाळांचे इयत्ता पाचवीचे वर्ग स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळेस जोडण्याबाबतचा शासन आदेश रद्द करावा अशी आग्रही मागणी शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे.

राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता पाचवीचे वर्ग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसोबत जोडण्याबाबतचा शासन निर्णय १६ सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या शासन आदेशामुळे राज्यात मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. या शासन आदेशामुळे अनेक खासगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांच्यावर अन्याय होणार असून संपूर्णपणे बिंदू संवर्गात बदल होणार आहे. त्याचा सर्वात मोठा फटका विनाअनुदानित तसेच अंशत अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना बसणार आहे. त्यामुळे हा शासन आदेश रद्द करण्याबाबत शिक्षक व शिक्षक  संघटनांकडून मागणी होत आहे असे आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार बाळाराम पाटील व आमदार दत्तात्रय सावंत यांनी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी प्रत्यक्ष भेटीदरम्यान सांगितले. यासंदर्भात निवेदनही देण्यात आले.

या शासन आदेशान्वये इयत्ता ५ वीचे वर्ग जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेला  जोडले तर शाळांमध्ये पाचवीच्या वर्ग खोल्या बांधणे गरजेचे आहे त्यामुळे त्याचा अतिरिक्त ताण शासनावर येणार आहे. तरी वरील सर्व बाबींचा विचार करता सदर शासन आदेश तात्काळ रद्द करावा, अशी मागणी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी केली.