27 February 2021

News Flash

सरपंचपदाच्या सर्व आरक्षण सोडती रद्द; निवडणुकीनंतर पुन्हा नव्याने होणार प्रक्रिया

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरपंचपदासाठी झालेल्या आरक्षण सोडती रद्द करण्यात आल्या असून ही प्रक्रिया निवडणूक मतदानानंतर नव्याने घेण्यात येणार आहे, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे जाहीर केले.

११ डिसेंबर २०२० रोजीच्या पत्रानुसार सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर म्हणजेच १५ जानेवारी २०२१ नंतर घेण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, काही जिल्ह्यांमध्ये मात्र सरपंचपदासाठीच्या आरक्षण सोडती याआधीच झाल्याचे निदर्शनास आले आहे. या झालेल्या सोडतीही आता रद्द करण्यात आल्या असून त्याही आता निवडणुकीनंतर नव्याने घेण्याबाबतचे आदेश आज १६ डिसेंबर २०२० रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.

गैरप्रकारांना पायबंद घालण्यासाठी निर्णय – मुश्रीफ

मुश्रीफ म्हणाले, “सरपंचपदाच्या आरक्षणानंतर संबंधित जातीच्या दाखल्यांची पडताळणी वेळेत न होणे, जातीचा दाखला अमान्य होणे तसेच बनावट प्रमाणपत्र सादर करणे इत्यादी कारणांमुळे निवडणूक रद्द करून पुनश्च नव्याने निवडणूक घेणे क्रमप्राप्त ठरते. या पार्श्वभूमीवर या बाबींचा सारासार विचार करून सरपंच आरक्षण सोडतीबाबत एकसमान धोरण असणे व होणाऱ्या गैरप्रकारांना पायबंद बसण्याकरिता तसेच योग्य व्यक्तीस न्याय मिळण्याच्या अनुषंगाने शासनाने ज्या जिल्ह्यांमध्ये सरपंचपदाची आरक्षण सोडत कार्यक्रम यापूर्वी राबविण्यात आला आहे, त्या जिल्ह्यात ही प्रक्रीया रद्द करून नव्याने सरपंच आरक्षण सोडत घेण्याबाबत निर्णय घेतला आहे. आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान कार्यक्रम १५ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. निवडणूक निकालाची अधिसूचना २१ जानेवारी २०२१ रोजी प्रसिध्द होणार आहे. त्यामुळे सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच सरपंच व उपसरपंच यांची निवड निवडणूक मतदानानंतर शक्यतो लवकरात लवकर किंवा ३० दिवसांच्या आत राबविण्यात यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.”

देशातील तसेच राज्यातील कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली अशा ग्रामपंचायतींवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील २९ सप्टेंबर २०२० रोजीच्या सुधारणेनुसार प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ११ डिसेंबर २०२० रोजीच्या पत्रानुसार राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूकींचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत निवडणूकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. तथापि, राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूकीची उद्घोषणा होण्यापूर्वी काही जिल्ह्यांमध्ये सरपंचपदाची आरक्षण सोडत काढलेल्या होत्या व अद्यापही बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही. हा सर्व सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आता निवडणुकीनंतर होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 8:33 pm

Web Title: cancellation of all reservations for sarpanch post the process will be renewed after the election aau 85
Next Stories
1 …त्यांना उकळ्या फुटण्याचे कारण नाही; जयंत पाटील यांचा टोला
2 “छगन भुजबळांच्या बोलण्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही”
3 जळगावचे सुपुत्र बीएसएफ जवान अमित पाटील यांना वीरमरण
Just Now!
X