शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिल्याने सोमवारी व मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी झुंबड उडणार आहे. खा. गांधी-गुंदेचा प्रणीत सहकार पॅनेलचे उमेदवार एकत्रित मिरवणुकीने, शक्तिप्रदर्शन करत मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर विरोधी पॅनेलचे बहुसंख्य उमेदवार सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी जाहीर प्रचार सुरू केला आहे.
मल्टिस्टेटच्या नियमामुळे उमेदवारांना यंदा प्रचाराला अवधी कमी उपलब्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल ते मतदान असा केवळ २५ दिवसांचा कालावधी आहे. संचालकांची कमी झालेली संख्या व इच्छुकांची संख्या अधिक तसेच एकमेकांचे उमेदवार फोडण्याचे प्रयत्न यामुळे दोन्ही पॅनेल उमेदवारांच्या नावाबाबत गोपनीयता बागळत आहेत. दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाली असून, अंतिम क्षणी त्यामध्ये एखाददुसऱ्या नावाचा बदल होण्याची शक्यता आहे.
सहकार पॅनेलचे दोन्ही नेते खा. दिलीप गांधी व सुवालाल गुंदेचा यांचे चिरंजीव अनुक्रमे सुवेंद्र गांधी व मनोज गुंदेचा यांची वर्णी पॅनेलमध्ये लागते का याकडेही सभासदांचे लक्ष राहणार आहे. गुंदेचा यंदा वयोमानामुळे उमेदवारी करणार की नाही याबद्दल चर्चा होत होती, त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली उमेदवारी कायम असून विरोधक अपप्रचार करत असल्याचे स्पष्ट केले. या पॅनेलच्या प्रचारात माजी नगरसेवक किशोर बोरा, अ‍ॅड. केदार केसकर हे दोन नवे चेहरे दिसू लागल्याने त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जाते. पॅनेलने मंगळवारी दुपारी टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मेळावाही आयोजित केला आहे.
विरोधी पॅनेलचे नाव अद्याप निश्चित झाले नसल्याचे समजले, मात्र हे पॅनेल म्हणजे पूर्वीच्या जनसेवा पॅनेलचे पुनर्जीवन असल्याचे सांगितले जाते. माजी अध्यक्ष अ‍ॅड. अशोक कोठारी, सुभाष भंडारी व अभय आगरकर हे तिघे पॅनेलचे सामूहिक नेतृत्व करणार आहेत. पॅनेलचे बहुसंख्य उमेदवार सोमवारी तर काही मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत.
संचालकांची संख्या कमी झाल्याने दोन्ही पॅनेलमध्ये प्रामुख्याने विद्यमानांचा भरणा राहील. नव्या चेह-याचा समावेश कमी असेल. गेल्या चार दिवसांत एकूण १४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये दीप चव्हाण, संजय छल्लारे, दीपक दुग्गड अशा काही विद्यमानांचा तर काही माजी संचालकांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज नेणा-याची संख्या ११२ वर गेली आहे.
 प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर
बँकेच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचाही मोठा वापर होऊ लागला आहे. अर्थात सोशल मीडियावरील प्रचारात बँकेच्या कारभाराऐवजी एकमेकांच्या उखाळय़ापाखाळय़ा करण्यावरच अधिक भर आहे. त्यात खा. गांधी यांना केंद्रीय मंत्रिपदाने दिलेल्या हुलकावणीचाही समावेश आहे. सोशल मीडियाच्या आधुनिक तंत्राचा वापर होतो आहे तसा ज्योतिषांचा पारंपरिक आधारही घेण्यात आला आहे. गांधी-गुंदेचा विरोधी पॅनेलचे नाव निश्चित न होण्यामागे हाच आधार कारण असल्याचे खात्रीलायकरीत्या समजले. बँकेच्या प्रचारात दरवेळेस निनावी पत्र रंगत आणत असतात, मात्र अद्याप अशी पत्रके अद्याप काढली गेली नाहीत.