परस्परविरोधी तक्रारी; गटविकास अधिकाऱ्यासह आठजणांवर गुन्हे

वाशीम जिल्ह्य़ाच्या मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे एका गर्भवतीला पकडणे ‘गूड मॉìनग’ पथकाच्या चांगलेच अंगलट आले. उघडय़ावर शौचविधी उरकल्यामुळे कारवाई केल्याचा दावा पथकाने केला आहे, तर त्या महिलेने आपण मॉìनग वॉकसाठी फिरायला गेले असता पथकाने कारवाई करून विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाशीम जिल्ह्य़ात विशेष अभियान सुरू आहे. शुक्रवारी सकाळी रमेश हाडोळे, पुष्पलता अफुने, एस.एम.सुडके व आशा भोसले यांचे गूड मॉìनग पथक मेडशी येथे दाखल झाले. यावेळी दोन महिला उघडय़ावर शौचविधी करताना पथकाला आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करीत असताना त्यांनी अरेरावी केली.  या वेळी संतोष घुगे याने सुद्धा पथकाला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार गटविकास अधिकारी संदीप कोटकर यांनी मालेगाव पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणी विरोधी बाजूनेही पथकाच्या विरोधात पोलीस तक्रार देण्यात आली. तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या नऊ महिन्याच्या गर्भवती असल्याने डॉक्टरांच्या सांगण्यानुसार शुक्रवारी सकाळी व बहिणीसमवेत चोंढी मार्गाने फिरण्यासाठी गेल्या असता परत येताना एक वाहन त्यांच्यासमोर थांबले. त्यातील पाच ते सहाजणांनी दोघींना पकडून गाडीत डांबले. विनयभंग केला व शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरून गटविकास अधिकाऱ्यासह पथकातील पुष्पलता अफुने, दत्ता चव्हाण, सुखदेव पडघान, इंगोले अशा पाच जणांविरुद्ध गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.