कोपर्डीतील (ता. कर्जत) अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार व नंतर तिच्या निर्घृण खुनाने राज्यभर गाजलेल्या गुन्ह्य़ाचे दोषारोपपत्र येत्या दोन, तीन दिवसांत पोलिसांकडून नगरच्या जिल्हा न्यायालयात दाखल केले जाणार आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. निकम अन्य एका खटल्याच्या सुनावणीसाठी गेल्या काही दिवसांपासून नगरमध्येच असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोषारोपपत्रास आकार दिला आहे.

येत्या शनिवारी किंवा सोमवारी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले जाणार आहे. कोपर्डीची घटना दि. १३ जुलैच्या सायंकाळी घडली. गुन्ह्य़ाचा तपास पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केला. या गुन्ह्य़ात जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (वय २२), संतोष गोरख भवाळ (वय ३०) व नितीन गोपीनाथ भैलुमे (वय २६, तिघेही रा. कोपर्डी, कर्जत) या तिघांना पोलिसांनी पूर्वीच अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या तिघांविरुद्ध बलात्कार, खून करणे, बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दोषारोपपत्र दाखल होईल.

पोलिसांनी तिन्ही आरोपींची मुंबईतील सीबीआयच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी केली असून त्याचे वैद्यकीय व फोरेन्सिक अहवाल दोषारोपत्रासमवेत दाखल केले जाणार आहेत. ग्रामस्थ व काही संघटनांनी घटनेत चौथा आरोपी सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र तपासात त्यादृष्टीने काही आढळले नसल्याचे समजले. गुन्ह्य़ाच्या प्रारंभीच्या काळात एक महिन्यात दोषारोपपत्र दाखल करण्याचे पोलिसांच्या वतीने जाहीर करण्यात आले होते, मात्र तपासात त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न केले जात असल्याने तसेच प्रयोगशाळेचे अहवाल प्राप्त होण्यास अवधी लागल्याने त्यासाठी वेळ लागल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. शिवाय कोपर्डीत घटनेनंतर सामाजिक, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचा परिणामही तपासावर झाला. कोपर्डीच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी या प्रमुख मागणीसाठी सध्या सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभर मोठे मूक मोर्चे सुरू आहेत. त्यामुळे दोषारोपपत्राच्या काटेकोरपणासाठी पोलिसांवर वाढता दबाव आहे.