डॉ.दाभोलकरांचा मारेकरी अद्याप सापडत नाही याच्या तीव्र वेदना आमच्या मनात आहेत, तसेच ‘सीबीआय’चा तपास सुरू झाला की नाही हे आम्हाला कळत नाही, त्यांनी आमच्याशी अद्याप संपर्क साधला नाही अशी प्रतिक्रिया डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला नऊ महिने उलटून गेले आहेत. मात्र अद्याप तपास समाधानकारक नाही. राज्य पोलिसांकडून तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. यातून राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणा अपयशी ठरल्याचे सिद्ध होते. न्यायालयाने तर पोलिसांवर ताशेरे झाडत लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडू नये यासाठी तपास सीबीआयकडे दिल्याचे सांगितले. खरे तर आम्ही राज्याच्या पोलिसांवर पूर्ण विश्वास दाखवला होता. त्यांनी तपासकार्य केलेही मात्र नऊ महिन्यांनंतर तपासात काही सापडत नाही; तसेच दिवसाढवळ्या खून होऊन यंत्रणा हतबल होते; हे चित्र मनाला खूप वेदना देणारे आहे. डॉक्टरांसारख्याची ही अवस्था तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील याचा अंदाज करणे ही अवघड आहे, असे डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले.
सर्वसामान्यांच्या सुख-दु:खाबद्दल राज्यकर्त्यांना आस्था नाही मात्र असे असताना काही राज्यांमध्ये उदा. असम, तामिळनाडू आणि हरियाणा या राज्यात जादूटोणाविरोधी कायदा व्हावा असे प्रयत्न सुरू झाले आहेत. केंद्रात सरकार बदलले तर हा कायदा बदलेल असे वाटत नाही कारण हा कायदा सगळ्यांना एकत्र घेऊन केला आहे. डॉक्टरांनी त्यासाठी २० वष्रे घालवली होती. आजपर्यंत ६० केसेस या कायद्याखाली नोंदवण्यात आल्यात, मात्र एकही केस या कायद्याच्या चुकीच्या वापराने किंवा चुकीचा वापर करून केल्याचे दिसत नाही. जर सरकार बदलल्यावर कायदा बदलणार असेल, तर त्यांची मानसिकता त्यातून दिसून येते असे डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले.