जिल्हा परिषदेच्या कारभारात पारदर्शीपणा आणण्याच्या हेतूने येथील परिषदेच्या मुख्य कार्यालयातील सर्व विभागांमध्ये क्लोज्ड सर्किट टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी नुकतीच या पदाची सूत्रे हाती घेतली असून येथील कारभार जास्त परिणामकारक होण्यासाठी काही योजना आखल्या आहेत. त्यामध्ये परिषदेच्या येथील मुख्यालयात सध्या मर्यादित प्रमाणात असलेले सीसी टीव्ही कॅमेरे प्रत्येक विभागात बसवून तेथील कारभार गतिमान आणि पारदर्शी करण्याच्या योजनेचा समावेश आहे. तसे झाल्यास कार्यालयीन वेळेत अनेकदा जागेवर न दिसणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगला चाप बसेल, अशीही अपेक्षा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती आणि गुणवत्ता सुधारण्यासाठीही प्रयत्न करण्याचा मिश्रा यांचा मनोदय आहे. तसेच या शिक्षकांसाठी खास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याची योजना आहे.