शालेय पोषण आहार योजनेची नगर व बुलढाणा जिल्हय़ांत केंद्रीय पथकामार्फत तपासणी होणार आहे. १५ सदस्यांचे हे पथक दि. ३० सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान या दोन्ही जिल्हय़ांतील विविध शाळांना थेट भेट देणार आहे. या तपासणीचा अहवाल पथक राज्य सरकारला सादर करणार आहे. जिल्हा स्तरापासून शाळास्तरापर्यंत ही तपासणी होणार आहे.  
या पथकात केंद्रीय सचिव, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले प्रतिनिधी, आहारतज्ज्ञ तसेच इतर अधिका-यांचा समावेश आहे. पथक कोणत्या तालुक्यातील कोणत्या शाळांना भेटी देणार याची माहिती ऐनवेळी शिक्षणाधिका-यांना दिली जाणार आहे. दि. ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान बुलढाणा जिल्हय़ात तर ४ ऑक्टोबर ते ७ दरम्यान नगरमध्ये तपासणी होईल. नंतर मुंबईत राज्य सरकारला त्रुटी व सूचनांचा अहवाल सादर केला जाईल.
केंद्रीय पथकाच्या तपासणीच्या पाश्र्वभूमीवर माध्यान्ह भोजन आहार योजनेत जिल्हय़ात सर्व काही आलबेल सुरू आहे हे दाखवण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागात व शाळा स्तरावर धांदल उडाली आहे. पथक कोणत्या बाबींची तपासणी करू शकते याची माहिती व खबरदारीच्या सूचना देण्यासाठी शिक्षण उपसंचालक महेश पालकर यांनी नगरमध्ये शिक्षणाधिकारी, योजनेचे अधीक्षक, सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची बैठक घेतली. अशीच बैठक आणखी एक उपसंचालक दिनकर टेमकर यांनी बुलढाणा येथे घेतल्याचे समजले.
पथकाच्या तपासणीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना आहार ताटातच द्यावा, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बस्करपट्टीच असावी, विद्यार्थ्यांची नखे कापलेली असावीत. भोजनाची जागा, किचनशेड, पिण्याच्या पाण्याची टाकी किंवा पिंप स्वच्छ असावे, स्वयंपाकासाठी लाकडे वापरू नयेत, गॅस टाकीच वापरावी, आहाराचा दर्जा चांगला असावा व ठरवून दिलेल्या कॅलरीज, प्रोटिन्स, भाजीपाला त्यात असावा याची दक्षता बाळगण्यास प्राथमिक शिक्षकांना बजावले गेले आहे.
असे असले तरी आहारातील वाटाणा व हरभरा हे धान्य नगरमधील अनेक शाळांना मागणी करूनही गेल्या काही महिन्यांपासून वितरित झालेले नाही. मसाला, हळद पावडर, मिरची पावडर अशा जास्त न लागणा-या वस्तूंचा अतिरिक्त पुरवठा झाला आहे. अनेक शाळांकडे गॅस सिलिंडर नाही. आहाराचे गेल्या चार महिन्यांपासूनचे अनुदान तसेच स्वयंपाकी व मदतनिसांचे मानधनही थकले आहे. रोज तांदूळ खाऊन वैतागलेल्या विद्यार्थ्यांना पथकाच्या तपासणीमुळे शिक्षकही सक्तीने तांदूळच खायला लावतील. पथकाच्या तपासणीनंतर आहाराची यंत्रणा पुन्हा शिथिल पडेल.