आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जे.जे. रुग्णालयातून केईएम रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. भुजबळ यांना पोटाचा आजार झाला असून त्यांच्यावर सध्या जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र जे.जे. रुग्णालयात गॅस्ट्रोलॉजी विभाग नसल्याने भुजबळ यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांना केईएममध्ये हलविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

भुजबळ यांच्या स्वादुपिंडाला संसर्ग झाल्याने भुजबळ यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याचे चाचण्यांवरून समोर आले आहे. होते. या त्रासामुळे त्यांना श्वास घेण्यासही थोडा त्रास होत होता. आहे त्यामुळे भुजबळ यांना कार्डिअॅक केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले होते. पुढील उपचारांसाठी जेजे रुग्णालयात हिपॅटोपॅनक्रिअॅटोबिलिअरी (एसपीबी) आणि गॅस्ट्रोएन्टरोलॉजी (जीआय) सुपर स्पेशालिटी विभाग उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयाच्या हिपॅटोपॅनक्रिअॅटोबिलिअरी विभागात दाखल केलं जाणार आहे. छगन भुजबळ यांना पोटावरील उपचारांसाठी केईएम रुग्णालयात हलवण्यासाठी आर्थर रोड जेल प्रशासन आणि हाटकोर्टाने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील अहवाल जेजे रुग्णालयाने केईएममधील डॉक्टरांना द्यावेत असे आदेशही देण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली होती. काही दिवसांपासून छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडत असून त्याविषयी फार चिंता वाटते. त्यांचे वय ७१ वर्षे असून ते गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत. छगन भुजबळ यांच्याविषयी न्यायालयाने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. दुर्दैवाने भुजबळांना वारंवार जामीन नाकारण्यात आला आहे. छगन भुजबळ हे ओबीसी नेते असून ५० वर्षे त्यांनी सार्वजनिक जीवनासाठी खर्च केली आहेत. छगन भुजबळांना योग्य वैद्यकीय उपचार मिळायला हवेत, हीच अपेक्षा आहे. तो त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे. योग्य उपचारांअभावी छगन भुजबळांची प्रकृती खालावली, तर त्यासाठी तुमचे सरकार जबाबदार असेल असा आरोपही त्यांनी केला होता.