अशोक तुपे

घराणी तीच, उमेदवारही त्याच कुटुंबातील. मात्र पक्ष बदललेले. जसे वारे वाहील तसे वाहत जाऊन सत्ता संपादन करणे हा अनेक नेत्यांचा स्थायीभाव. पीछेहाट सुरू झाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीला राज्यात सर्वप्रथम नगरमधूनच गळती लागली. राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्य़ाचे राजकारणच बदलले. जिल्ह्य़ातील नेते बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळविला. त्याच वेळी सहकारातील ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांना राजकीय बदलांचा अंदाज आला. विधानसभा राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकता येणार नाही. म्हणून उभयतांनी भाजपशी जुळवून घेतले. स्वत:च्या सुनांना भाजपातून निवडून आणले. राजळे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे मेव्हुणे. तर कोल्हेंची थोरातांबरोबर युती. मैत्री व नात्यागोत्यापेक्षाही सत्तेचा गुंता सोडविण्यात त्यांना यश मिळाले. नगरच्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांचे एकेकाळी वर्चस्व होते. शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, माजी खासदार यशवंतराव गडाख, माजी मंत्री मधुकर पिचड, माजीमंत्री बबनराव पाचपुते, माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार अप्पासाहेब राजळे, माजी आमदार नरेंद्र घुले, आमदार अरुण जगताप, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याशी त्यांचे सख्य. मात्र, माजी खासदार बाळासाहेब विखे हेच त्यांच्याशी एकाकी झुंज देत. स्वर्गीय गोिवदराव आदिक यांचे पवारांशी कधी बिनसले, तर कधी जुळले. काँग्रेस, राष्ट्रवादीची चलती होती तोपर्यंत सारे पवारांशी जुळवून घेत.

लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साऱ्यांना धक्का देत राधाकृष्ण विखे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन गृहनिर्माण मंत्री केले. त्यामुळे नगरमधून डॉ. सुजय विखे व शिर्डीतून सेनेचे सदाशिव लोखंडे खासदार झाले. दोन्ही जागा युतीला मिळाल्या. मोदी लाटेत अकरा विधानसभा मतदारसंघात युतीला मताधिक्य मिळाले. अकोल्यात फक्त काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना मोठे मताधिक्य मिळाले. मात्र, निवडणुकीनंतर विखे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना धक्का देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्याच टप्प्यात राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य, माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड व त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला.

बारा विरुद्ध शून्य असा कौल विधानसभेत घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून त्यात पहिल्या टप्प्यात अकोल्यात यश मिळाले आहे.

कर्जतमध्ये चुरशीची लढत?

जिल्ह्य़ात कर्जत-जामखेड मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची होण्याची चिन्हे आहेत. कारण शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे भाजपाचा ओबीसी चेहरा असलेले पालकमंत्री राम शिंदे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविणार आहेत. पवारांचा जिल्ह्य़ाच्या राजकारणातील प्रभाव संपविण्याचे विखे यांचे ध्येय असल्याने आता शिंदे यांना निवडून आणण्यासाठी भाजपाने रणनीती आखली आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भाजपला मताधिक्य मिळाले. विखे यांच्या पत्नी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांना थोरातांविरुद्ध भाजपकडून उभे करण्याचे डावपेच आहेत. विखे यांच्याविरोधात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांना शिर्डीतून उतरविण्याचा थोरातांचा प्रयत्न आहे. थोरात यांना मतदारसंघातच गुंतविण्याचे डावपेच आहेत. माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या भाजपा प्रवेशाने पवार दुखावले आहेत.

श्रीगोंदे या राष्ट्रवादीकडे असलेल्या मतदारसंघातही चुरस होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. आमदार जगताप यांच्यासह  माजी मंत्री पाचपुते, अनुराधा नागवडे यांचे पक्ष हे निवडणुकीत ऐनवेळी ठरतील. नगरमधून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे आमदार आहेत. त्यांचेही तळ्यातमळ्यात सुरू होते. भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे ते जावई. ही जागा युतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाटय़ाला गेली आहे.

कोपरगावमध्ये काळे-कोल्हे यांचा संघर्ष हा पिढय़ान्पिढय़ा चालत आला आहे. दोघांत तिसरा नको, असे त्यांचे ठरलेले असते. या मतदारसंघात भाजपच्या स्नेहलता कोल्हे या आमदार आहेत. शिवसेनेत गेलेले आशुतोष काळे हे पुन्हा राष्ट्रवादीत आले आहेत. युती तुटली तर काळे राष्ट्रवादीत राहतात की पुन्हा सेनेत जातात. हा प्रश्न आहे. पाथर्डीतून भाजपाच्या आमदार मोनिका राजळे, राहुरीतून भाजपाचे शिवाजी कर्डीले, पारनेरमधून विधानसभेचे उपसभापती शिवसेनेचे विजय औटी, नेवाशातून भाजपाचे बाळासाहेब मुरकुटे यांच्या उमेदवाऱ्या निश्चित आहेत.

आजघडीला राष्ट्रवादीला जिल्ह्य़ातील तिन्ही जागा राखण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे, भाजपवासी झालेल्या विखे-पाटील यांना जिल्ह्य़ात आपली ताकद दाखवायची आहे. बाळासाहेब थोरात यांनाही विखे-पाटील यांचे प्रस्थ मोडून काढायचे आहे.

विधानसभा निवडणुकीत बारा विरूद्ध शून्य असा निकाल लागेल. दोन्ही काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही. भाजपाकडे नेत्यांचा ओघ लागला आहे. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे मधुकर पिचड भाजपात आले. अजूनही प्रवेश सुरू आहेत. विजयी होण्याचे गणित महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभेत भाजपा-सेनेला मोठे यश मिळेल. जिल्ह्यातील सर्व सहकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचे वर्चस्व येत आहे.

– प्रा. भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

नगर जिल्ह्य़ात दोन्ही काँग्रेसकडे पूर्वी सहा जागा होत्या. आता त्यापेक्षा निश्चितच जास्त जागा मिळतील. महायुतीने विकास कामाचे केवळ फलक लावले. कामे झालीच नाहीत, झाली ती निकृष्ठ प्रतीची. बारा विरूद्ध शून्य हा चुनावी जुमला आहे. त्यात अर्थ नाही. पालकमंत्री राम शिंदे हे जामखेडमधून पराभूत होतील. मात्र प्रदेशाध्यक्ष थोरात निवडणूक जिंकतील.

– बाळासाहेब साळुंके, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडे तीन जागा होत्या त्या तर टिकविणारच. पण आणखी वाढ होणार. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे हे १२विरुद्ध ० असे चित्र असेल असा दावा करतात. त्यांची ताकद दाखवायचा ते प्रय करतील.  लोकसभा व विधानसभा निवडणुका या वेगवेगळ्या आहेत. त्या निकालाचा विधानसभेशी संबंध जोडता येणार नाही. संगमनेरात लोकसभेला भाजपाला मताधिक्य मिळते मात्र विधानसभेत थोरात प्रचंड मताधिक्कय़ाने जिंकतात. हेच चित्र अन्यत्रही दिसते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जागा वाढतील.

-राजेंद्र फाळके,

जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पक्षीय बलाबल

कोपरगाव : भाजपा

नेवासे : भाजपा

राहुरी : भाजपा

कर्जत-जामखेड : भाजपा

पाथर्डी : भाजपा

पारनेर : शिवसेना

श्रीरामपूर : काँग्रेस

संगमनेर : काँग्रेस

श्रीगोंदा : राष्ट्रवादी

नगर : राष्ट्रवादी

शिर्डी : काँग्रेस