सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत
‘‘राज्यातील दुष्काळाची राज्य शासनाला चिंता आहेच. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दुष्काळाच्या संकटावर मात करून शेतकऱ्यांना सुखी बनविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून येत्या पाच वर्षांत जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा विडा शासनाने उचलला आहे,’’ असे प्रतिपादन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यात सहवीज निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ तसेच १३० टनी बॉयलरचे अग्निप्रदीपन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, भाजपचे आमदार सुभाष देशमुख, काँग्रेसचे आमदार भारत भालके आदी उपस्थित होते. कारखान्याचे अध्यक्ष तथा कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राज्यात सर्वत्र कमीजास्त प्रमाणात टंचाई निर्माण झाली असली तरी त्यावर मात करण्याचेच धोरण शासनाने आखले आहे, असे नमूद करीत सहकारमंत्री पाटील पुढे म्हणाले, की येत्या पाच वर्षांत जलयुक्त शिवार अभियानामुळे दुष्काळ हद्दपार होईल. मराठवाडा भागात जलयुक्त शिवार अभियानाची कामे चांगल्या प्रकारे झाली आहेत. सोलापूरने तर या कामात आघाडी घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला. अडचणीत आलेल्या साखर कारखानदारीला आणखी अडचणीत न टाकता त्यांना मदतच करण्याची भूमिका शासनाने अंगीकारल्याचा दावाही त्यांनी केला. खासदार धनंजय महाडिक यांनी भीमा साखर कारखान्याच्या माध्यमातून चालविलेल्या विकास कामांची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
अध्यक्षीय भाषणात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी, सोलापूरसह राज्यात ओढवलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी खंबीर उपाययोजना शासनाने आखल्या पाहिजेत. पिण्यासाठी पाणीपुरवठा प्राधान्याने करावा, अशी आग्रही मागणी केली. आमदार भारत भालके यांनीही विकास प्रश्नावर सूचना मांडली. या कार्यक्रमास नानासाहेब महाडिक, पंढरपूरच्या वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, सी. पी. बागल, प्रा. शिवाजी सावंत, सतीश जगताप आदींसह सभासद शेतकरी उपस्थित होते.