कोणत्याही ‘प्रायोजित’ आíथक पाठबळाशिवाय निखळ कवितेवरील प्रेमापोटी दरवर्षी साजरा होणारा ‘वाटा कवितेच्या’ हा कार्यक्रम उद्या (बुधवारी) येथे होत आहे. या निमित्त ज्येष्ठ कवी, समीक्षक, अनुवादक चंद्रकांत पाटील यांना पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते शब्दसह्याद्री सन्मान देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे हे सातवे वर्ष आहे.
या उपक्रमात आजवर सतीश काळसेकर, प्रकाश होळकर, प्रकाश घोडके, संतोष पद्माकर पवार, प्रकाश किनगावकर, श्रीकांत देशमुख, बालाजी मदन इंगळे, तुकाराम धांडे, चंद्रशेखर सानेकर, डॉ. वृषाली किन्हाळकर आदींसह अनेक कवींनी हजेरी लावली. या उपक्रमात कविता सादर करणाऱ्या कवींची संख्या ४० हून अधिक आहे. उद्या होणाऱ्या कविसंमेलनात रमेश इंगळे उत्रादकर (बुलढाणा), श्रीधर नांदेडकर (औरंगाबाद), मनोज बोरगावकर (नांदेड) हे कवी सहभागी होत आहेत.
चांगली कविता जगण्याला बळ देते, जगणे समृद्ध करते या भावनेतून कवितेच्या ऋणापोटी हा उपक्रम दरवर्षी घेतला जातो. गेल्या काही वर्षांपासून या उपक्रमाला ‘शब्दसह्याद्री सन्मान’ या गौरव पुरस्काराची जोड देण्यात आली. यापूर्वी ‘कवितारती’चे संपादक पुरुषोत्तम पाटील, ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना गौरविण्यात आले. ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. चंद्रकांत पाटील यांच्या संपादित, अनुवादित व स्वतंत्र पुस्तकांची संख्या ५०हून अधिक आहे. िहदीतील चंद्रकांत देवताले, अशोक वाजपेयी आदींच्या कवितांचे मराठी अनुवाद पाटील यांनी केले, तसेच मराठीतील श्रेष्ठ कविता िहदीत पोहोचवली. ‘कवितांतरण’ या प्रकल्पाद्वारे जगभरातील कवितेला त्यांनी मराठी भाषेत आणले. भीष्म साहनी यांच्या ‘तमस’ कादंबरीचा त्यांनी केलेल्या मराठी अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. पाटील यांनी देश-विदेशातील कविसंमेलनात सहभाग नोंदवला. अखिल भारतीय स्तरावरील महाराष्ट्र भारती पुरस्काराने गेल्या वर्षी त्यांना सन्मानित करण्यात आले. मराठवाडा साहित्य परिषदेनेही त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला.
इंद्रजित भालेराव, भारत काळे, आसाराम लोमटे, विठ्ठल भुसारे, केशव खटिंग, प्रा. भगवान काळे, अरुण चव्हाळ, दिलीप शृंगारपुतळे, कल्याण कदम, गंगाधर गायकवाड, बबन आव्हाड, संजय मुलगीर, संतोष नारायणकर, सुरेश हिवाळे आदींच्या सक्रिय सहभाग व योगदानातून शब्दसह्याद्री प्रतिष्ठान साकारले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2015 1:55 am