चंद्रपूर

जिल्ह्यात आज एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला. बल्लारपूर येथील ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचे आज करोनामुळे सकाळी ११ वाजता वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात निधन झाले. श्वसनाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्या बालाजी वार्ड, बल्लारपूर येथील या नागरिकाला २ ऑगस्टला दाखल करण्यात आले होते. रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णाची प्रकृती दाखल झाल्यापासूनच गंभीर होती. जिल्हयातील रहिवासी असणाऱ्यांपैकी हा करोनामुळे झालेला पाचवा मृत्यू आहे.

जिल्हयातील पाच वगळता आतापर्यंत एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य दोन मृत्यूमध्ये तेलंगणा राज्य व बुलडाणा जिल्हयातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्हयात ८९८ बाधिताची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तपासण्या वाढविण्यात आल्या असून नागरिकांनी कोणतेही लक्षण आढळल्यास तपासणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले गेले आहे. करोना रुग्णांची संख्या येत्या काळात वाढणार असून नागरिकांनी मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे, शारीरिक अंतर पाळणे व शक्यतो घराबाहेर न निघण्याच्या सूचना पाळाव्यात असे देखील आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण पुढे येत असल्यामुळे या भागातील नागरिकांनी देखील आपल्या आरोग्याशी न खेळता सर्व सूचनांचे पालन करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.