News Flash

चंद्रपूर : ”आम्हाला वेतन देणे होत नाही तर मारून टाका” कोविड योद्ध्यांच्या भावनांचा उद्रेक…

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व पालकमंत्री वडेट्टीवार यांना काढता पाय घ्यावा लागला.

मागील सात महिन्यांच्या थकीत वेतनासाठी तीन महिन्यापासून डेरा आंदोलन करणाऱ्या चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या भावनांचा आज उद्रेक झाला. ”आम्हाला वेतन देणे होत नाही तर मारून टाका” या शब्दात कंत्राटी कामगारांनी फिर्याद मांडली.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे अमित देशमुखांची पत्रकार परिषद सुरू असताना मागील बाकावर बसलेल्या तीन कोविड योद्धा महिला कामगारांनी थकीत वेतनासाठी देशमुख यांच्यासह पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी कामगारांच्या भावनेचा उद्रेक झाला. आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या नंतर महिला कामगार थकित पगारासाठी ढसाढसा रडायला लागल्या. यावेळी महिला कामगारांनी देशमुख यांच्यासह पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे व इतर लोकप्रतिनिधी यांना जाब विचारत, आम्ही काय गुन्हा केला की सात महिन्यांपासून आम्हाला वेतन नाही? असा प्रश्न उपस्थित केला. कामगारांचा प्रचंड संताप व उद्रेक पाहून अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर यांच्यासह नियोजन भवनातून काढता पाय घेणं उचित समजलं.

नियोजन भवनातून बाहेर निघाल्यानंतर सुद्धा बाहेर उभ्या असलेल्या कंत्राटी कामगारांनी अमित देशमुख यांना घेरले. यावेळी देशमुख यांच्यासमोर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यांचा व पालकमंत्र्यांचा निषेध करण्यात आला तसेच गो-बॅक अमित देशमुखचे नारे देखील देण्यात आले. ‘थकीत पगार द्या,मगच जिल्ह्यात या, अशी देखील घोषणाबाजी केली.

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्याची माहिती मिळाल्यानंतर जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी ‘गो-बॅक’ अमित देशमुखचा नारा दिला होता. ‘आधी कोविड योद्ध्यांचे थकीत पगार द्या, मगच चंद्रपूर जिल्ह्यात या’ असा इशारा पप्पू देशमुख यांनी दिला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दंगा पथक व पोलिसांचा फौजफाटा अमित देशमुख यांच्या संरक्षणासाठी लावण्यात आला होता. पप्पू देशमुख यांच्यामागे सुद्धा काल रात्रीपासून पोलिसांच्या गुप्तचर विभागाचा ससेमिरा लागला होता. या सर्वांना बगल देत जनविकास सेनेच्या कामगारांनी आज अमित देशमुख यांना गाठले. जोपर्यंत थकीत पगार व किमान वेतन लागू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील मी कामगारांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भावना सुद्धा यावेळी जन विकासचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या सर्व प्रकारामुळे जिल्हा प्रशासन चांगलेच हादरून गेले. देशमुख या जिल्ह्याच्या दौऱ्यावर प्रथमच आले. त्यातही काँग्रेसच्या स्थानिक लोकप्रतिनिधी व नेत्यांच्या चुकीमुळे त्यांना कामगारांच्या तीव्र रोषाला बळी पवाडे लागले. या आंदोलन व रोषाचे व्हिडिओ समाज माध्यमावर सर्वत्र फिरत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 10:40 pm

Web Title: chandrapur emotions of covid warriors erupt in front of amit deshmukh msr 87
Next Stories
1 Coronavirus – राज्यात दिवसभरात ६७ हजार ७५२ रूग्ण करोनामुक्त
2 ICAI CA परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
3 भारत बायोटेक महाराष्ट्राला देणार ६०० रुपये दराने ८५ लाख लशी!
Just Now!
X