स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छसर्वेक्षण २०२० मध्ये चंद्रपूर महानगरपालिकेस यश प्राप्त झाले आहे. देशातील  दहा लाख लोकसंख्येपर्यंतच्या स्वच्छ शहरांमध्ये चंद्रपूरला चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार, आज ऑनलाइन ‘स्वच्छ महोत्सव २०२०‘ समारंभात केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी जाहीर केला. सध्याची करोना प्रभावित परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारच्या नागरी कार्य व गृहनिर्माण मंत्रालयाच्यावतीने या स्वच्छ महोत्सव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले होते.

आपल्या शहराचा स्वच्छता आलेख नेहमीच उंचावत गेला आहे. हीच परंपरा कायम राखत गतवर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९‘ मध्ये  २९ व्या क्रमांकाचे मिळालेले मानांकन, यावर्षी उंचावत स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये देशातील दहा लाख लोकसंख्येपर्यंतच्या स्वच्छ शहरांमध्ये चंद्रपूरने चौथ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून झेप घेतली आहे. हा पुरस्कार चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी एकात्म भावनेने केलेल्या स्वच्छताविषयक जाणीवांचा व प्रत्यक्ष स्वच्छता कार्याचा असल्याचे सांगत महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त  राजेश मोहिते यांनी हा राष्ट्रीय बहुमान समस्त स्वच्छताप्रेमी चंद्रपूरकर नागरिकांना समर्पित केला आहे.

देशभरातील ३८२ शहरांमधून चंद्रपूर शहराला दहा लाख लोकसंख्येपर्यंतच्या शहरांमध्ये देशात चौथा क्रमांक  व राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने केंद्रीय स्वच्छता निरीक्षक समितीव्दारे महानगरपालिका क्षेत्रातील स्थळांची पूर्वकल्पना न देता प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. पाहणी करत असताना नागरिकांशी सहजपणे संवाद साधत त्यांच्याकडून शहरातील स्वच्छतेविषयी प्रत्यक्ष अभिप्राय घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू केलेल्या स्वच्छता अँपवरही नागरिकांच्या प्रतिसादाची नोंद घेण्यात आली होती. तसेच, स्वच्छ भारत मिशनच्या राष्ट्रीय केंद्रातून अनेक नागरिकांना दूरध्वनी करून शहरातील स्वच्छतेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या होत्या.

स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये चंद्रपूर शहरातील नागरिकांनी ज्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व आपल्या शहराला स्वच्छतेत उत्कृष्ट क्रमांकावर आणले त्याबद्दल नागरिकांचे आभार व अभिनंदन करते. मागील आयुक्त संजय काकडे व वर्तमान आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी जे परिश्रम घेतले, स्वछता जनजागृती करण्यात सर्व नगरसेवकांनी जी मोलाची मदत केली त्याचे हे फलित आहे. –  राखी कंचर्लावार, महापौर

देशातून २९ वा क्रमांक मिळविणाऱ्या आपल्या शहराने यावर्षी देशातून चौथा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षीही आपण स्वच्छता राखण्यात कुठेच कमी नव्हतो, मात्र काही घटकात आपण मागे पडलो होतो. मात्र या वर्षी नागरिकांनी महानगरपालिकेचे प्रयत्न जाणून व स्वच्छता ही आपली जबाबदारी समजून स्वच्छता प्रश्नांना उत्तरे दिली व शहराला महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांकावर आणण्यास मदत केली आहे. शहरातील नागरिकांचे, पदाधिकाऱ्यांचे व महानगरपालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. – राजेश मोहीते, मनपा आयुक्त, चंद्रपूर