News Flash

चंद्रपूर – करोना नियमावलीचे सर्रास उल्लंघन करणाऱ्यांवर हॉटेल, लॉन, क्लासेसवर दंडात्मक कारवाई

महानगरपालिकेने प्रत्येकी पाच हजार रूपये दंड ठोठावला

संग्रहीत

चंद्रपूरमध्ये करोनाचा उद्रेक सुरू असतांना कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हल्दीराम हॉटेल, उत्सव लॉन व इंस्पायर व इनसाईट या शिकवणी वर्गावर कारवाई करून, महानगरपालिकेने प्रत्येकी पाच हजार रूपये दंड ठोठावला आहे. तसेच हल्दीराम हॉटेलला ५ दिवस बंद ठेवण्याची ताकीद देखील देण्यात आली आहे.

महापालिका झोन क्रमांक तीनच्या सहायक आयुक्त शीतल वाकडे, विद्या पाटील, डॉ. अश्विानी भारत, सुरक्षा अधिकारी राहुल पंचबुध्दे, क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, प्रदीप मडावी, महेंद्र हजारे पथकाने  पाहणी केली असता,  उत्सव लॉन येथे लग्न कार्य सुरु असल्याचे दिसून आले. या लग्न कार्यात ५० पेक्षा अधिक वऱ्हाडी सहभागी झाले होते. त्यामुळे लॉन मालकास दंड ठोठवण्यात आला. तसेच,  हल्दीराम हॉटेलचे कर्मचारी करोना बाधित आढळले,  मनपा आरोग्य विभागाने सर्व कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र चाचणी न करता कर्मचारी कामावर होते. त्यामुळे या हॉटेलला दंड ठोठवण्यात आला तसेच ५ दिवस हॉटेल बंद ठेवण्याची कारवाई करण्यात आली.

याशिवाय, शिकवणी वर्ग बंद ठेवण्याचे सक्त आदेश असतांना इंस्पायर कोचिंग क्लासेस व इनसाईट कोचिंग क्लासेस तसेच इतर कोचिंग क्लासच्या मालकांनी क्लास  सुरु ठेवल्याचे दिसून आले.  तिथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्गात बसून होते. नियमांचे सर्रास उल्लंघन करून शिकवणी वर्ग सुरू असल्याने सर्व क्लास चालकांकडून  दंड वसूल करण्यात आला. तसेच त्यांना ताकीद देखील देण्यात आली.

लसीकरण आणि नियमांमध्ये मिळालेली शिथिलता यामुळे बेफिकीर वृत्ती दिसून येत आहे, करोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करावी, नियमांचे पालन न करणाऱ्या मॅरेज हॉल, लॉन, हॉटेल्स, दुकाने, प्रतिष्ठानांवर दंड ठोठवावा व प्रसंगी सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त राजेश मोहिते यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार प्रशासनद्वारे कारवाई केली गेली. करोनाबाधीतांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होताना दिसत असून कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक काळजीपूर्वक व काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज असुन, यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष अपेक्षित नाही असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 7:37 pm

Web Title: chandrapur punitive action against hotel lawn classes for gross violation of corona rules msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
2 करोना संकटातही गलिच्छ राजकारण करणाऱ्या केंद्रीय आरोग्यमंत्री व भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी! – पटोले
3 “दादा मास्क काढा….,” भाषणादरम्यान चिठ्ठी पाठवणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी सुनावलं
Just Now!
X