पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम म्हणतात की एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला. मी चहावाला होतो, रेल्वे स्टेशनवर चहा विकायचो. एक चहावाला पंतप्रधान झाला ही बाब विरोधकांना बघवत नाही. मात्र प्रत्यक्षात ही थाप आहे. प्रवीण तोगडिया म्हणतात की मी चाळीस वर्षे मोदींसोबत आहे मात्र कधीही मी त्यांना चहा विक्री करताना पाहिलेले नाही. मोदी ज्या ठिकाणी चहा विकायचे ते स्टेशनच अस्तित्त्वात नाही असाही आरोप छगन भुजबळ यांनी केला. एवढंच नाही तर चहा विकायचा ही थाप पुरे देश विकला नाही म्हणजे मिळवलं, असाही खोचक टोला भुजबळांनी लगावला.

नांदेडमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त सभा होती. या सभेत छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. आयआयटीच्या विद्यार्थ्यांसमोर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते तेव्हा त्यांनी चहावाल्याचं उदाहरण दिलं. एक चहावाला नाल्याजवळ चहा तयार करत होता. त्याने नाल्यात एक पाइप सोडला होता आणि दुसरा गॅसला लावला होता. नाल्यातून गॅसनिर्मिती होते असा शोध त्यांनी लावला. याचा अर्थ काय नाल्यात गॅस असतो, म्हणजे काही चिंताच नाही घरी सिलिंडर संपला की थेट नाल्याजवळ न्यायचा, पाइपने गॅस भरून घ्यायचा. थापा मारण्यालाही काही सीमा असते की नाही? असा प्रश्न भुजबळ यांनी विचारला. सध्या सिलिंडरची किंमत ८०० / ९०० रुपयांना आहे तो द्यायची गरजच लागणार नाही असं झालं तर. मोदींचं धोरण म्हणजे आम आदमीसे मनकी बात आणि अंबानी, अदाणीसे धनकी बात असंच आहे असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थापा मारत आहेत, दादागिरी करत आहेत. हुकुमशाही धोरणच ते राबवत आहेत. त्यांच्या अशा खोट्या आश्वासनांवर आता जनता विश्वास ठेवणार नाही असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.