मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; कृषी विकासदर उणे राहील्याने अर्थव्यवस्थेवर ताण येण्याची भीती
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह कोणालाही कोणत्याही चौकशीत निर्दोषत्व प्रमाणपत्र देण्यात आले नसून सर्व चौकशा व्यवस्थित सुरू असल्याचे स्पष्ट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळामुळे कृषी विकासदर उणे राहणार असल्याने अर्थव्यवस्थेवर ताण येत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेनचे समर्थन करीत शहरी भागाचा विकास करून महसूल वाढविला, तर ग्रामीण भागाला मदत देता येईल, असा टोला शिवसेनेचा उल्लेख न करता लगावला.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे विकासदर व आíथक गुंतवणूक मोठय़ा प्रमाणावर वाढेल, असा विश्वास व्यक्त करून चीनमध्ये बुलेट ट्रेनमुळे सातपट विकासदर वाढल्याचा दावा फडणवीस यांनी केला. स्मार्टसिटी, बुलेट ट्रेनला शिवसेनेने विरोध केला आहे. या पाश्र्वभूमीवर बोलताना स्मार्ट शब्द आवडत नसेल, तर दुसरा वापरा, पण कचरा व सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, जलसाठे, नद्या शुद्ध ठेवणे आदी बाबी करायच्या नाहीत का, असा सडेतोड सवाल त्यांनी केला. अधिवेशनातील महत्त्वाचे प्रश्न, दुष्काळ, शिवसेनेकडून होत असलेली टीका आदी विविध मुद्दय़ांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली भूमिका पत्रकारांसमोर मांडली.
पुनर्वकिासातून ५० हजार कोटी रुपये?
वांद्रे शासकीय वसाहतीचा पुनर्वकिास केल्यास २५ ते ५० हजार कोटी रुपये मिळतील. एल अँड टी कंपनीने त्या संदर्भात सादरीकरण केले आहे. याआधी खासगीकरणातून केलेल्या प्रकल्पांमध्ये शासकीय तिजोरीत रक्कम न येता खासगी व्यक्तींचा फायदा होत होता. वास्तविक जमिनींचा विकास हा खरे तर महसूल उभारणीचा महत्त्वाचा मार्ग आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट सिटीला शिवसेनेचा विरोध आहे, याबाबत विचारता स्मार्ट सिटी म्हणजे हायफाय शहर अपेक्षित नाही. मुंबईसह राज्यातील एकाही शहरात १०० टक्के कचरा व सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. सांडपाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे साठे प्रदूषित होत आहेत. मग हे प्रश्न सोडवायचे नाहीत का, वाहतुकीचा प्रश्नही मोठा असून मुंबईची अवस्था दिल्लीप्रमाणे होण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही, असे मत व्यक्त करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

सार्वजनिक बांधकाम खात्याने भुजबळ यांना निर्दोषत्व प्रमाणपत्र दिले असल्याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे; पण निर्दोषत्व प्रमाणपत्र दिल्याचे फेटाळून लावत चौकशीमध्ये एखाद्या विभागाने काही मत मांडले, म्हणजे ते स्वीकारले गेले, असे होत नाही. त्यावर वेगळा विचार करणारी यंत्रणा आहे.
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</strong>

* सलगच्या दुष्काळामुळे कृषी विकासदर यंदाही उणेच राहणार असून अर्थव्यवस्थेवरही ताण आला आहे, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे अन्य क्षेत्रांच्या विकासावर ताण येतो.
* विकासदर १० टक्क्यांहून अधिक राहिला, तर अर्थव्यवस्था भक्कम राहते; पण त्यापेक्षा कमी राहिला, तर त्याचा परिणाम विकासावर होईल.
* अर्थसंकल्पाव्यतिरिक्त निधी उभारणी मोठय़ा प्रमाणावर करावी लागेल, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

* मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग २०१९ पर्यंत पूर्ण करणार
* या महामार्गाला जमिनी देणाऱ्यांना भरपाईचे विशेष पॅकेज देणार
* सलमान खानच्या शिक्षेविरुद्धच्या अपिलावर अद्याप निर्णय नाही
*  महाधिवक्त्यांचे मत घेऊन निर्णय: कोणालाही पाठीशी घालणार नाही