मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी आमची भूमिका आहे, असं समता परिषदेचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणालेत. वैजापूर येथे आयोजित समता मेळावा व बहुजन परिषदेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला समता सैनिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रारंभी भुजबळ यांच्या हस्ते विषमता निर्माण करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करण्यात आले. त्यानंतर भुजबळ यांनी मनुस्मृतीवर टीका करत आताही देशात एक प्रकारे मनुवृत्ती जागी झाली असून उसळी मारत आहे. समतेचे चक्र उलटे फिरत असल्याचे सांगितले. ज्या मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केलं ती आज पुन्हा जाळण्याची वेळ आली आहे. मनुस्मृती माणसांमध्ये भेदभाव करते असं ते म्हणाले.

साठ वर्षांच्या लढाईनंतर ओबीसींना २७ टक्के आरक्षण मंडल आयोगामुळे मिळाले; पण आता मराठा आरक्षणामुळे या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. ओबीसींची जनगणना कायद्याच्या चौकटीत न करता ५४ टक्के असलेल्या ओबीसींची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची जणगणना करा, अशी मागणीही त्यांनी केली.

देशात मंदिर मशिद वाद व राज्यात मराठा ओबीसींमध्ये फूट पाडून त्यांना मते मिळवायची आहेत अशी टीका त्यांनी यावेळी भाजपा सरकारवर केली. न्याय मागितला तर तुरुंगात टाकणारे हे सरकार आहे. देशात मंदिर, मशीद व राज्यात मराठा-ओबीसींंमध्ये फूट पाडून त्यांना मते मिळवायची आहेत. अच्छे दिनची भाषा करून शेतकरी, सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या या सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवा, असं आवाहनही त्यांनी केलं. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांनी समतेचा संदेश दिला. फुले, शाहू, आंबेडकरांनी विज्ञानाची कास धरण्यास सांगितले; पण आज संभाजी भिडेसारखी माणसं संतती होण्यासाठी आंबे खाण्याचा सल्ला देतात. कायद्याचा आज संकोच होतोय असे सांगत त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर चौफेर फटकेबाजी केली. केंद्रातील मोदी सरकार नोटबंदी, स्मार्टसिटी, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आदी सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. त्यांना आंबेडकरांचे संविधान हटवून हुकुमशाही आणायची आहे,’ अशी टीका त्यांनी केली.