मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच राहणार असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. राज्याला त्यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे सांगून त्यांनी फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. नागपूर येथील निवासस्थानी ते बोलत होते. फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण दिल्लीतून बोलावणे येत नाही, तोपर्यंत मीच मुख्यमंत्री राहणार असे सांगून मुख्यमंत्र्यांनी स्वतः या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात चांगले काम केले आहे. केंद्रातही चांगले काम करण्याची त्यांची योग्यता आहे. पण राज्यातील अनेक आव्हाने आणि समस्या पाहता राज्याला त्यांच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे, असे गडकरी म्हणाले. काही दिवस मी अमेरिकेत होतो. कालच परतलो आहे. माझ्यावर नवीन खात्याची जबाबदारी सोपवणार असल्याची माहिती मिळाली. पण कुणाला कोणते खाते द्यावे, याचा अधिकार पंतप्रधानांना असतो. रस्ते परिवहन आणि जहाजबांधणी विभागाचेच इतके काम आहे की थकलो आहे. याच खात्यात खूप काही करायचे आहे. त्यामुळे पुन्हा नव्या खात्याचा भार पेलण्यासाठी वेळ नाही, असेही त्यांनी सांगितले. अनेक देशांत विशेषतः अमेरिकेत रस्ते वाहतूक, नागरी उड्डाण, रेल्वे अशी सर्व पायाभूत सोयीसुविधांची खाती सांभाळण्याची जबाबदारी एकाच विभागाकडे दिली जाते, पण ते खाते कुणाला द्यायचे याचा निर्णय पंतप्रधान घेतात, असा दाखलाही त्यांनी दिला. दरम्यान, गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी त्यांनी देश भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त व्हावा, असे साकडे बाप्पाला घातले आहे.

[jwplayer fP09Fw8O-1o30kmL6]