मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोपटासारखे बोलतात. पण त्यांची कृती मात्र दिसत नाही, अशी बोचरी टीका शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांनी केली. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या व जिल्हय़ात तत्काळ दुष्काळ जाहीर करा अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा शुक्रवारी देण्यात आला. परभणी येथे शिवसेनेने दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व खासदार संजय जाधव यांनी केले.
जिल्ह्यातील पिकांच्या वस्तुस्थितीनुसार आणेवारी जाहीर झाली आहे. मात्र शासन दुष्काळ जाहीर करायला चालढकल करत आहे. १९७२च्या दुष्काळापेक्षाही भयानक परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी या वेळी खा. जाधव यांनी केली. तत्काळ दुष्काळ जाहीर न झाल्यास मंत्र्यांना जिल्हाबंदी करणार असल्याचा इशारा या मोर्चातून देण्यात आला.
वडले म्हणाले, मराठवाडय़ात भीषण दुष्काळ पडलेला असताना मुख्यमंत्री म्हणतात, की टंचाईसदृश परिस्थिती आहे. केवळ पोपटासारखे बोलून चालत नाही. दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्याशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही. या वेळी खा. जाधव यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाषण केले. परभणी महापालिका प्रशासनावर त्यांनी या वेळी कडाडून टीका केली. शहर पाणीपुरवठा योजनेच्या दोन निविदा काढून या योजनेची वाट लावली. शहरात घाणीचे साम्राज्य आहे. धार रस्त्यावर असलेला कत्तलखाना जर हटवला नाहीतर सगळी घाण महापालिकेच्या कार्यालयात आणून टाकली जाईल, असा इशारा खा. जाधव यांनी दिला. या वेळी आ. डॉ. पाटील यांनी शेतकऱ्यांना जायकवाडीचे पाणी मिळायलाच हवे व लोअर दुधना प्रकल्पाचीही चार आवर्तने पिकांना मिळायला हवीत, अशी मागणी केली. शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय असल्याने सरकारने केवळ कागदी उपाययोजना करण्याऐवजी प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे, असे सांगितले. या वेळी डॉ. दळणर, रेंगे यांचीही भाषणे झाली.
सुरेश ढगे यांना अटकाव
मोर्चात शिवाजी पुतळय़ाजवळील मदानात आल्यानंतर या ठिकाणी त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. या वेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सुरेश ढगे यांनी व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न केला असता युवा सेनेचे श्रीनिवास रेंगे यांनी जोरदार हरकत घेतली. गद्दाराने व्यासपीठावर येऊ नये, अशी भूमिका घेत मीरा रेंगे यांच्या समर्थकांनी ढगे यांना व्यासपीठावर येण्यास मज्जाव केला. दोन्ही बाजूंनी या वेळी जोरदार बाचाबाची झाली. खा. जाधव, आ. डॉ. पाटील यांनी मध्यस्थी करून या वादावादीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ढगे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला नसल्याचा ठपका ठेवत या वेळी मोर्चात त्यांना गद्दार म्हणून व्यासपीठावर येऊ दिले नाही.