गेल्यावर्षी राज्यात दुष्काळाची स्थिती होती, त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची ताकद देण्याची मागणी विठ्ठलाकडे केली होती. त्याच्या कृपेमुळे यावर्षी चांगला पाऊस होतोय. त्याची कृपादृष्टी अशीच राहू दे. त्याचबरोबर राज्यावर येणाऱया संकटांचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य मिळू दे, असे साकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राचे आराध्यदैवत विठ्ठलाला घातले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये शुक्रवारी पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांची पत्नी सत्त्वशीला चव्हाण यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. 
चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने अत्यंत ताकदीने आणि समर्थपणे दुष्काळाचा सामना केला. सोलापूर, सांगली, सातारा आणि संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता जास्त होती. मात्र, चारा छावण्या, पाण्याची साठवणूक आणि कमीतकमी वापर यामाध्यमातून सर्वांनी दुष्काळाचा मुकाबला केला. राज्य सरकारने याकाळात अनेक चांगली कामे केली. त्यामुळे दुष्काळाच्या तीव्रतेतून सुखरुपपणे बाहेर पडता आले. सध्या राज्यात सगळीकडे चांगला पाऊस होतोय. विठ्ठलाची कृपादृष्टी अशीच राहू दे.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा उज्वला भालेराव, राज्याचे पाणी पुरवठा, स्वच्छता मंत्री दिलीप सोपल, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह, आमदार विलास लांडे, आमदार सुरेश खाडे, मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे, माजी आमदार उल्हासदादा पवार, पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आदी मान्यवर उपस्थिती होते.
यंदा जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील नामदेवराव देऊबा वैद्य व गंगुबाई नामदेवराव वैद्य यांना मुख्यमंत्र्यांसमवेत शासकीय महापूजेचा मान मिळाला.