शासनाने झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या राहत्या ठिकाणीच घरे बांधून द्यावी, स्वत:चे घर नसलेल्या नागरिकांसाठी २५ हजार घरकुले बांधण्याची योजना सुरू करावी, या मागण्यांसाठी सीटू संघटनेतर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शेकडोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
घरांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्यामुळे अनेकांना झोपडपट्टीत बिकट परिस्थितीत राहणे भाग पडले आहे. हजारो नागरिक भाडेकरू म्हणून राहत आहेत. बेघर, भाडेकरू व गरजू नागरिकांच्या घराच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सीटू संघटनेतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, किसन गुजर, तानाजी जायभावे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात महिला मोठय़ा प्रमाणात सहभागी झाल्या. राज्य शासनाने सिडको व म्हाडाच्या माध्यमातून मागील काळात हजारो घरे बांधल्यामुळे काही नागरिकांचे घराचे स्वप्न साकार झाले. परंतु काही वर्षांपासून सिडको व म्हाडा या संस्थांनी घरकुलांची नवी योजना राबविली नाही. यामुळे घराचा तीव्र प्रश्न निर्माण झाला. महापालिकेने जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेंतर्गत केलेली घरकुल योजनाही पालिकेतील गैरकारभारामुळे फलदायी ठरलेली नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. महापालिकेच्या घरकुल योजनेतील २५ टक्के घरे ही असंघटित कामगार, घरेलू कामगार, कंत्राटी कामगार व बंद कंपन्यांमधील कामगारांना द्यावी, घर बांधणी योजनांसाठी शासकीय मालकीच्या जमिनी उपलब्ध कराव्यात, या मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.