एमआयडीसीकडून २१ दशलक्ष लिटर पाणी मिळाल्याने दिलासा

भाईंदर : मीरा-भाईंदर शहराला गेल्या दोन महिन्यांपासून एमआयडीसीकडून मंजूर पाणी कोटय़ापैकी ३१ दश लक्ष लिटर पाणीकपात करण्यात आल्यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र संताप व्यक्त झाल्यानंतर पुन्हा २१ दश लक्ष लिटर पाण्याची वाढ करून मीरा-भाईंदरचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न एमआयडीसीकडून करण्यात आला आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. यात स्टेम प्राधिकरणकडून ८६ दश लक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो आणि एमआयडीसीकडून १३५ दश लक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र, गेल्या महिन्याभरापासून यात तब्बल ३१ दश लक्ष लिटर पाणीपुरवठा कमी करण्यात आला होता. त्यामुळे मीरा-भाईंदर शहराची २१३ दश लक्ष लिटर पाण्याची गरज असताना केवळ १८० दश लक्ष लिटरच पाणीपुरवठा होत असल्याने गंभीर प्रमाणात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. मात्र ही पाणीटंचाईची समस्या पाण्याच्या कमतरतेमुळे नसून राज्य शासनाकडून छळ करण्याकरिता पाणी कमी सोडण्यात येत असल्याचे आरोप महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप पक्षाने १ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन केले होते.

यानंतर शिवसेना आणि भाजप पक्षाच्या वरिष्ठांनी पाणी प्रश्न दूर करण्याकरिता प्रयत्न करण्यास सुरुवात केली. तसेच मीरा-भाईंदर शहराचा पाणी प्रश्न दूर व्हावा म्हणून आयुक्त दिलीप ढोले यांनी वारंवार एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरवठा केला. त्यामुळे मीरा-भाईंदर शहराला अधिक २१ दश लक्ष लिटर पाणीपुरवठा वाढवून देण्यात आला असल्याचे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले. तर भाजप पक्षाच्या सततच्या पाठपुरवठय़ामुळे मीरा-भाईंदर शहरातील पाणी प्रश्न मार्गी लागत असून यात अधिकाधिक वाढ करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी दिली.