संस्थाचालकांविरुद्ध गुन्हा

पंढरपूर : शिक्षिकेशी अश्लील कृत्य केल्याचा ठपका ठेवत इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांला शाळेतून काढून टाकण्याचा अजब प्रकार पंढरपुरातील एका शैक्षणिक संस्थेने केला आहे. यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट पसरली असून संबंधित मुलाच्या पालकांनी संस्थेच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हा गुन्हा दाखल होताच या संस्थेने संबंधित मुलाचा प्रवेश पूर्ववत केला.

पंढरपूरमध्ये ‘फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल’ नावाची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत शहरातील एका चहा टपरी चालवणाऱ्या व्यक्तीचा मुलगा इयत्ता पहिलीत शिकतो. संबंधित मुलाने शिक्षिकेसमोर आक्षेपार्ह हातवारे केल्याबद्दल संस्थेने त्याला शाळेतून काढून टाकले. हा प्रकार समजताच या मुलाचे तसेच अन्य मुलांचे पालकही हादरले. त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मार्फत शाळेत धाव घेत विचारणा केली. त्यावर त्यांना कारवाईमागे वरील कारण सांगण्यात आले. यावर पालकांनी ही कृती चुकीची असून प्रवेश रद्द करण्यासाठी संस्थेकडून अशा गोष्टी केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला. आपल्या पाल्याचा प्रवेश हा आरक्षित जागेवर झालेला असल्याने या सवलतीच्या जागेवर अन्य मुलाचा प्रवेश करण्यासाठी संस्थेकडून असे खोटे आरोप केले जात असल्याचा आरोप संबंधित मुलाच्या पालकांनी केला. तसेच मुलाचे शैक्षणिक नुकसान न करण्याची मागणीही या वेळी त्यांनी केली.

दरम्यान यानंतरही संस्थेने आपल्या कारवाईत बदल न केल्याने संबंधित मुलाच्या पालकांनी आज बाल हक्क संरक्षण अधिनियमन अंतर्गत संस्थेचे चालक नागेश माळवे यांच्या विरोधात पंढरपूर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला. तसेच शिक्षण विभागाकडेही तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलीस आणि शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. गुन्हा आणि चौकशी सुरू होताच संस्थेकडून संबंधित मुलाचा प्रवेश आज लगेच पूर्ववत करण्यात आला.

समुपदेशनाची गरज

पहिलीत शिकणारा मुलगा अश्लील चाळे करू शकतो का? की अशी तक्रार करण्यामागे काही वेगळे कारण आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. जर अशी काही कृती घडली असेलच तर थेट शाळेतून काढून टाकण्यापूर्वी त्या मुलाचे समुपदेशन होणे गरजेचे असल्याचे मत शाळेतील अन्य पालकांकडून व्यक्त होत आहे.

प्रवेश पूर्ववत करण्याचे आदेश

पंढरपूरमधील संबंधित पालकांची तक्रार प्राप्त झाली असून आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत. कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी प्रथम या विद्यार्थ्यांला शाळेत पुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश संस्थेला दिले आहेत. या प्रकरणी चौकशी केल्यावर संस्थाचालक दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

– संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी, सोलापूर

शाळा प्रवेश पूर्ववत

संबंधित मुलाच्या पालकांना आम्ही या घटनेबाबत कल्पना देत केवळ पत्र दिले होते. त्या मुलाचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आम्ही त्याला पुन्हा शाळेत आणि त्याच वर्गात प्रवेश देत आहोत.

– नागेश माळवे, संस्थाचालक, फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल