अंबाजोगाई खासगी वसतिगृहातील घटना

बीड : शिक्षणासाठी खाजगी निवासी वसतिगृहात राहत असलेल्या दहावीच्या वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून एका मुलाने मंगळवारी दुपारी जाड वस्तू फेकून मित्राच्या डोक्यात मारली. त्यात दत्ता अशोक हजारे (वय १५ रा. पौळिपप्री ता. परळी) याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी बुधवारी सकाळी मुकुंदराज परिसरात परीक्षेसाठी आलेल्या अल्पवयीन आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरकोळ कारणातून विद्यार्थ्यांनेच मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरात अमृतेश्वरनगरमध्ये राजमाता गुरुकुल या खाजगी वसतिगृह परिसरातील गरीब कुटुंबातील अनेक मुलं शिक्षणासाठी राहतात. परळी तालुक्यातील पौळिपप्री येथील दत्ता हजारे व त्याचा मित्र अल्पवयीन आरोपी हे दोघेही एकाच खोलीत राहत होते.

मंगळवारी सकाळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झाले. दुपारी शाळेतून परतल्यानंतर वसतिगृहाच्या गच्चीवर अभ्यास करत बसलेल्या दत्ता हजारे याला पाहिल्यानंतर अल्पवयीन आरोपीने सकाळच्या भांडणाचा राग मनात धरुन जाड वस्तू दत्ताच्या डोक्यात मारली. मार वर्मी लागल्याने दत्ता निपचित पडल्यानंतर अल्पवयीन आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. थोडय़ाच वेळात इतर मुलांनी आरडाओरड केल्यानंतर वसतिगृह चालकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

रुग्णालयात विद्यार्थ्यांला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी रात्रीपासून पोलिसांनी फरार मुलाचा शोध घेतल्यानंतर सकाळी दहावीच्या प्रथम सत्र परीक्षेसाठी आरोपी  मुकुंदराज विद्यालय परिसरात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.