भाजपामध्ये मेगाभरती नाही, लिमिटेड भरती आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सध्या राज्याचा दौरा करत आहेत. गुरुवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी अमरावतीमधून महाजनादेश यात्रेला सुरुवात केली. दरम्यान वर्ध्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपात अनेक नेते प्रवेश करत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना सांगितलं की, “आमची मेगाभरती नाही तर लिमिटेड भरती आहे. पण ज्यांचा भाजपाच्या धोरणांवर विश्वास असेल त्यांना नक्कीच पक्षात घेऊ”.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “गेल्या पाच वर्षातील कामांचा आढावा महाजनादेश यात्रेतून मांडत आहे. विदर्भातून यात्रेला सुरुवात केली असून विदर्भात आम्ही प्रचंड विकास केला आहे. पाच वर्षात तुलनात्मकदृष्ट्या प्रचंड कामं केली आहेत. पुढील पाच वर्षात राज्य दुष्काळमुक्त करण्यावर मुख्य लक्ष असणार आहे”.

विधानसभा निवडणुकीत युतीचा अभूतपूर्व विजय होईल- मुख्यमंत्री

“काही पक्षांची स्थिती अशी झाली आहे की त्या पक्षात कोणी राहातच नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना शपथ दिली जात आहे. पण शपथ घालून तरी कार्यकर्ते थांबतील का?”, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला लगावला.

ईव्हीएमच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, “विरोधकांनी ईव्हीएमला दोष देण्याऐवजी आत्मचिंतन केलं तर उत्तर मिळेल. ईव्हीएम काही आत्ता आलेलं नाही”. “ईव्हीएमच्या जोरावर विरोधकांनी सर्वत्र राज्य केलं आहे, मग आताच आंदोलन का?”, असा सवाल यावेळी मुख्यमंत्र्यांनी विचारला. शिवसेनेसोबत असलेल्या युतीवर बोलताना “युती करताना दोन गोष्टी घ्याव्या लागतील, दोन गोष्टी सोडाव्या लागतील”, असं त्यांनी म्हटलं.