मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा बंगला मुंबई महापालिकेने डिफॉल्टर यादीत टाकला आहे. कारण या बंगल्याचं साडेसात लाखांचं पाणी बिल थकलं आहे. दरम्यान यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावत आपण स्वत: मुख्यमंत्र्यांचं पाणी बिल भरणार असल्याचं सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांना आंघोळीला, तोंड धुण्यास उशीर होता कामा नये अन्यथा निर्णय प्रक्रियेत उशीर होईल असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

‘मुख्यमंत्र्यांचं बिल कितीही असो. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते आम्हा सगळ्यांचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचं बिल मी स्वत: चेकने भरणार आहे. त्यांचं पाणी अजिबात कापता कामा नये. त्यांना आंघोळीला, तोंड धुण्यास उशीर होता कामा नये. त्यामुळे महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेत उशीर होईल आणि हे महाराष्ट्राला परवडणारं नाही’, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

फक्त मुख्यमंत्रीच नाही तर इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांची ८ कोटी रूपयांची पाणी बिलं थकली आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेकडून पाणी बिल थकबाकीदारांची माहिती मिळवली होती. त्याद्वारे ही माहिती समोर आली आहे.

एरवी सामान्य मुंबईकरांनी पाण्याचं बिल थकवलं तर महापालिकेकडून कठोर पावलं उचलली जातात. अनेकदा पाणीही बंद केलं जातं. मात्र मुख्यमंत्री आणि इतर नेते मंडळींबाबत एक न्याय आणि लोकांबाबत एक न्याय महापालिका करत असल्याचं या प्रकारामुळे उजेडात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं ७ लाख ४४ हजार ९८१ रुपये पाणी बिल थकलं आहे. तर इतर नेत्यांच्या पाणी बिलाची रक्कम एकत्र केली तर ती ८ कोटीच्या घरात जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिल थकलेलं असूनही मुंबई महापालिका कारवाई का करत नाही हा प्रश्न विचारला जातो आहे.