‘लोकसभेत ज्यांना दोन अंकी खासदारांचा आकडा पार करता आला नाही. ते पण पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये आहेत. पंतप्रधानपदाची खुर्ची आहे की संगीत खुर्ची हेच कळत नाही’, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली. मुंबईत मंगळवारी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी बोलताना फडणवीस यांनी आतापर्यंत राष्ट्रवादीचे कधी दोन आकडी खासदारही निवडून आले नाहीत आणि ते पंतप्रधानपदाचं स्वप्न बघतात, संगीत खुर्ची खेळतात असा टोला पवारांना लगावला. तसंच, यावेळची निवडणूक ही भाजपासाठी नाही तर भारतासाठी महत्त्वाची आहे. 2019 मध्ये भारताचे भविष्य नक्की कुठल्या दिशेने जाणार हे ठरविण्याची ही निवडणूक आहे. जर यावेळी जनतेने जर काँग्रेसला सत्ता दिली आणि भाजपाला पराभूत केलं तर ती ऐतिहासिक चूक असेल आणि भारत आणखी 100 वर्ष मागे जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

सध्या सुरू असलेली पायाभूत विकास कामे यापैकी एकही संकल्पना आमची नाही, ही सर्व 15-20 वर्षांपूर्वी नियोजित केली होती. मात्र कोणाकडे इच्छाशक्ती नव्हती. गेल्या ४ वर्षात जितकं काम केलंय त्याच्या २५ टक्केही काम आघाडीनं केलं नाहीये. विकासकामं वेळेत झाली नाहीत, यामागे इच्छाशक्तीचा अभाव हे प्रमुख कारण आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी मागील सरकारला लगावला.