News Flash

बंडखोरी म्यान!

मतदारसंघातील नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण ६ ऑक्टोबर रोजी रात्री जव्हार येथे दाखल झाले.

(संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विक्रमगडमधून बंडखोरांची माघार

पालघर जिल्ह्यत विक्रमगड व पालघर या मतदारसंघात युतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. मात्र या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घातल्याने विक्रमगड भाजपातील बंडाळी क्षमली आहे. तर शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आमदार अमित घोडा यांनी अवघ्या चार दिवसांत आपली भूमिका बदल्याने पालघरमधून दाखल आपली उमेदवारी मागे घेतल्याने पालघरमध्ये होणारे संभाव्य बंड मावळले आहे.

माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार विष्णू सवरा यांचे उत्तराधिकारी म्हणून डॉ. हेमंत सवरा यांना भाजपतर्फे विक्रमगड मतदारसंघात उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यामुळे इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेखा थेतले, भाजपा आदिवासी आघाडीचे अध्यक्ष हरिश्चंद्र भोये तसेच विक्रमगड पंचायत समितीचे विद्यमान सभापती मधुकर खुताडे यांच्यामध्ये नाराजी पसरली होती. गेल्या पाच वर्षांत आमदार विष्णू सवरा यांनी या मतदारसंघाकडे पुरेशा प्रमाणात लक्ष दिले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसल्याचे कारण देत ही नाराज मंडळी गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्षां बंगल्यावर गेले होते. मात्र मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ  न शकल्याने या तिन्ही इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

भाजपच्या नाराज मंडळींना मुख्यमंत्र्यांनी वर्षां निवासस्थानी ५ ऑक्टोबर रोजी रात्री     बोलवले होते. त्या अनुषंगाने या सर्व मंडळींनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांसोबत सुमारे ४५ मिनिटे चर्चा केली. राज्याचा कारभारामध्ये आगामी काळात विक्रमगडला प्रतिनिधित्व दिले जाईल तसेच विक्रमगडकडे आपण आगामी काळात विशेष लक्ष देऊ , असे आश्वासन देऊन या नाराज मंडळींची समजूत काढण्यात आली.

मतदारसंघातील नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण ६ ऑक्टोबर रोजी रात्री जव्हार येथे दाखल झाले. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी समस्यांच्या आणि टीकांचा भडिमार केला. रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न  केला असता काही कार्यकर्त्यांनी बैठक सोडून जाण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या भावना आपल्याला समजल्या असून याप्रकरणी आपण स्वत: लक्ष घालून तसेच या मतदारसंघाकडे मुख्यमंत्री लक्ष घालतील, असे आश्वासन दिल्यानंतर काही प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दूर झाली.

बोईसरची नाराज मंडळी ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’!

पालघर जिल्हा भाजपाचे सरचिटणीस व बोईसर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक संतोष जनाठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते घरी नसल्याचे सांगण्यात आले, तसेच त्यांचा भ्रमणध्वनी गेल्या दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असल्याने त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ  शकला नाही. संतोष जनाठे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत असून पक्षाचा निर्णयाविरुद्ध उमेदवारी कायम ठेवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 1:25 am

Web Title: cm devendra fadnavis ward akp 94
Next Stories
1 अमित घोडा यांची नाटय़मयरित्या माघार!
2 अधिकारी आले, प्रदूषण घटले!
3 कांद्याच्या साठवणुकीतून महागाईवर मात
Just Now!
X