मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिंहस्थ कुंभमेळा कामांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी नाशिकसह त्र्यंबकेश्वरलाही भेट देणार असल्यामुळे साधू-महंतांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांसमोर समस्या मांडता येतील, असे त्यांचे म्हणणे आहे.
जुलैपासून सुरू होत असलेल्या कुंभपर्वासाठी शासनस्तरावर मोठय़ा प्रमाणात निधी मंजूर असूनही कामांना त्र्यंबकेश्वर येथे गती नाही. सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी साधू-महंतांनी केल्या आहेत. साधू आखाडय़ांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांविषयीही त्यांच्यात नाराजी आहे. याबाबत वेळोवेळी त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असताना आता थेट मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वतीने साकडे घालण्यात येणार आहे. स्थानिक रहिवाशांचाही कामांविषयी रोष आहे. रस्ता मंजूर पण गटारे नाहीत, अशा स्वरूपातील आराखडा कसा मंजूर झाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सिमेंटच्या चांगल्या रस्त्यावर काँक्रीटीकरण करून उंची वाढविण्याचे प्रकार झाले आहेत. तुटक्या व हलक्या दर्जाचे पाइप गटारासाठी आणून घाईने टाकण्यात येत आहेत. रस्त्यांची कामेही घाईघाईत उरकले जात आहेत. गटारी आणि पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांचेही यात नुकसान होऊन नागरिकांनाच त्याचा भरुदड सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्री प्रथमत: त्र्यंबकेश्वरी कुंभमेळ्याच्या निमित्त बैठकीत येत असल्याने षडदर्शन आखाडय़ाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येत असून ते उपस्थित होत असल्याबद्दल आनंदी असल्याची प्रतिक्रिया शंकरानंद सरस्वती यांनी व्यक्त केली आहे.