राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद भुषवणारे देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात अद्यापही हत्यांचे सत्र सुरुच आहे. गेल्या ४८ तासांत येथे तीन जणांचे खून झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थाच शिल्लक नसल्याचे चित्र आहे.

गुन्हेगारी टोळ्यांमधील हाणामारी, किरकोळ वादावादी यातून या हत्या झाल्या आहेत. गेल्या काही काळापासून नागपूरात गुन्हागारांचे वर्चस्व वाढले असून काही गुंडांना तर नागरिकांनीच ठेचून ठार मारल्याच्या घटना येथे यापूर्वी घडल्या आहेत.

गेल्या दोन दिवसांत झालेल्या हत्या प्रकरणांमध्ये एका अल्पवयीन मुलाकडून किरकोळ कारणावरुन खूनाचा प्रकार समोर आला आहे. बहिणीच्या घरी नेल्यानंतर सोबत जेवायला न बसवल्याच्या कारणातून शुभम वासनिक या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याचा प्रकार नागपूरात घडला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला लकडगंज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्याचबरोबर नागपुरात दारु पिण्याच्या वादातूनही एक खून झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी ही घटना घडली असून शहरातील पार्डी भागातील गृहलक्ष्मी नगर परिसरात घरात घुसून एकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला आहे. चंदन उर्फ कालू वर्मा असे या हल्ल्यातील मृताचे नाव असून अमन गजभिये या तरुणाने त्याच्यावर धारदार शस्त्राने तब्बल २१ वार केले. याप्रकरणी पोलिसांनी गजभियेला अटक केली आहे.

दरम्यान, अवैध धंद्याच्या वादातून एका तरुणाचा रविवारी रात्री खून करण्यात आला आहे. अंकित धकाते असे या मृत तरुणाचे नाव असून रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याचा भररस्त्यात खून कऱण्यात आला.