धरणग्रस्तांचे आधी पुनर्वसन करा, त्यांच्या पाल्यांना नोकऱ्या द्या, कापूस आणि सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या आणि या प्रश्नांसबंधी सरकारची भूमिका अगोदर स्पष्ट करा आणि नंतर भाषण करा, अशा घोषणा देत यवतमाळातील शेतकऱ्यांनी मंचावरच धडक मारल्याने बेंबळा धरणावरील सिंचन परिषदेचा कार्यक्रम अध्र्यावर सोडून मुख्यमंत्र्यांना काढता पाय घ्यावा लागला.
विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांच्या पुढाकाराने शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्य़ात बेंबळा धरणावर सिंचन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्र्याच्या भाषणापूर्वी पुरके यांनी केलेल्या प्रास्ताविकानंतर प्रा. पुरके यांच्या प्रास्ताविकानंतर सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचीही भाषणे झाली. जवळपास आठ हजार शेतकरी या परिषदेला हजर होते. त्यांनी ही सर्व भाषणे शांतपणे ऐकली. मुख्यमंत्री भाषणासाठी उभे झाले. त्यांनी पाण्याचे व्यवस्थापन, नियोजन आणि महत्व या विषयावर बोलण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या भाषणाच्या उत्तरार्धात काही शेतकरी थेट मंचावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या हाती मागण्यांचे निवेदन देत प्रश्नांच्या फैरी मुख्यमंत्र्यावर झाडू लागले. अचानक आलेला शेतक ऱ्यांचा जमाव पाहून मुख्यमंत्र्यांनी भाषण थांबवले.
धुमसता असंतोष
यवतमाळ जिल्हयात लहान मोठे बरेच जल प्रकल्प असून, यातील बहुतांश प्रकल्पांचे काम अध्र्यावरच आहे. ज्या प्रकल्पांचे काम पूर्ण झाले तेथील वसाहतीत प्रकल्पग्रस्तांना पिण्याचे पाणीसुध्दा मिळत नाही. त्यांना जमिनीचा मोबदलाही अत्यल्प मिळाला. कित्येक शेतकऱ्यांना दुसरीकडे शेत घेण्यासाठी पसाच उरला नाही.