निसर्ग या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला होता त्यावेळीही त्यांनी निसर्ग चक्रीवादळाचं संकट महाराष्ट्रासमोर आहे आणि या संकटात मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन केलं होतं. आता या वादळाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राने तयारी केली आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी?
निसर्ग चक्रीवादळ ३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहचणार आहे

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

मच्छिमारांना समुद्रात बोलावून घेण्यात आलं आहे, जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे

या चक्रीवादळात मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या १६ तुकड्यांपैकी १० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर ६ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत दवंडी आणि लाऊडस्पीकर याद्वारे सांगण्यात आले आहे. तसेच त्यांच्यासाठी पक्की निवास गृह तयार ठेवण्यात आली आहेत

मदत व बचाव कार्य करताना कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नॉन कोविड रुग्णालयंही उपस्थित करण्यात आली आहेत

वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच पालघर व रायगडमधील रासायनिक कारखाने, अणुउर्जा प्रकल्प या ठिकाणी खबरदारी घेण्यात आली आहे

वादळामुळे झाडे पडणे, भूस्खलन होणे, जोरदार पाऊस पडणे या शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत

मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषतः सखल भागातील झोपडपट्टीवासीयांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

आवश्यकता भासल्यास अधिक रुग्णालयं उपलब्ध करण्या आणि त्या ठिकाणी जनरेटर्सची सुविधा करण्यास सांगण्यात आले आहे

मंत्रालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू असून लष्कर, हवाईदल, नौदल आणि भारतीय हवामान विभान यांना समन्वय ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर व्हीसीद्वारे चर्चा करून या चक्रीवादाळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.