जून महिन्यापासून राज्यात मिशन बिगीन अगेन सुरु करुन लॉकडाउनचे नियम टप्प्या टप्यानं शिथिल करण्यात येत आहेत. काही राज्यांनी पटापट निर्णय घेऊन व्यवहार सुरळीत केले आहेत. असे असले तरीही महाराष्ट्र सरकार कोणतही घाई करणार नाही. त्यामुळे एक सप्टेंबरपासून राज्यात लॉकडाउन पूर्णपणे उठणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीदरम्यान दिले आहेत.

ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीमधील करोना नियंत्रण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी या तिन्ही पालिकांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ठाणे पालिका मुख्यालयात बैठक घेतली. आपण यापूर्वी बऱ्याच गोष्टी सुरू करण्यास परवानगी दिली आहे, मात्र उर्वरित काही गोष्टी सुरू करता येणार नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी एक सप्टेंबरनंतरही राज्यात निर्बंध आणखी काही काळ कायम ठेवण्याचे संकेत दिले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे. परंतु त्याने हुरळून गेलो तर संकटाला आमंत्रण दिल्यासारखे होईल आणि कौतुकाने हुरळून जाऊन गाफील राहता येणार नाही. त्यामुळे अन्य राज्यांनी काही गोष्टी घाईगडबडीने केल्या असल्या तरी मात्र महाराष्ट्र तसे करणार नाही. जोपर्यंत खात्री पटत नाही तोपर्यंत काही निर्बंध शिथिल करता येणार नाहीत. जगभरात काही देशांनी काही गोष्टी घाईगडबडीने सुरु केल्या. पण महाराष्ट्रत तशी गडबड केली जाणार आहे. कारण आपण ज्या गोष्टी सरु केल्या आहेत. त्या पुन्हा बंद होणार नाहीत याी दक्षता घेऊन सुरु केल्या आहेत. पण ज्या गोष्टी सध्या उघडणे शक्य नाही, किंवा त्या उघडल्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव किती वाढेल. याची खात्री नाही त्या सुरु केल्या नाहीत.

ठाणे पालिका मुख्यालयात झालेल्या  बैठकीस नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्री महोदयांचे सल्लागार अजोय मेहता, आरोग्य प्रधान सचिव, डॉ. प्रदिप व्यास, खा. श्रीकांत शिंदे, आ. संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक यांसह सर्व मनपा आयुक्त, पोलिस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.