“लॉकडाउन हा आपण लागू केलेला आहेच. आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आपण अनलॉक म्हणजे आता एकएक गोष्टी सोडवत चाललो आहोत. नाहीतर सारखं लॉकडाउन १ अनलॉक १, लॉकडाउन २ अनलॉक २ असे प्रकार होतील. घाईघाईनं लॉकडाउन केला हे चुकीचं आहे. तसंच घाईघाईनं अनलॉक करणंही चुकीचं आहे,” असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. तसंच एकदम सर्व सुरू करण्यासाठी मी म्हणजे काही ट्रम्प नाही. मी माझ्या लोकांना तळमळताना पाहू शकणार नाही, असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- आकडेवारी लपवली जाण्याच्या वक्तव्यांकडे मी लक्ष देत नाही कारण… : उद्धव ठाकरे

“लोकं कंटाळली आहेत हे मान्य आहे. परंतु लोकांचा कंटाळा घावण्यासाठी आपण अनलॉक करत नाही. लोकांचा पोटापाण्याचा प्रश्नही निर्माण होतोय हेदेखील मान्य आहे. पण जर आपण एकदम लॉकडाउन उठवला आणि अचनाक साथ वाढली, त्यात लोकांचे जीव गेले तर पोटापाण्याच्या प्रश्नाचं काय करणार?,” असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. “जर कारखान्यांमध्येदेखील ही साथ गेली तर काय करणार? जर असं हवं असेल तर किती साथ पसरायची ती पसरेल, जेवढ्या लोकांचे जीव जायचे ते जातील पण आम्हाला लॉकडाउन नको, मग ही बाब स्वीकारावी लागेल. अमेरिकेत जसं केलं तसं माझी स्वीकारण्याची तयारी नाही. मी म्हणजे काही ट्रम्प नाही. मी माझ्या लोकांना माझ्या डोळ्यासमोर तळमळताना मी पाहू शकणार नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- ‘राज्यातील अनेक शहरांमध्ये पुन्हा पुन्हा लॉकडाउन का करावं लागत आहे?’; मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

आणखी वाचा- मुंबईच्या रस्त्यावर वडापाव केव्हा मिळणार?; पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे

“रेल्वे रुळावरूनच चालली पाहिजे. ती तारेवरची कसरत आहे. रेल्वे, वडापाव सर्व सुरू करणार, पण त्यासाठी आपल्याला एक टोक स्वीकारलं पाहिजे. जर एखाद्या कुटुंबाला जर काही झालं तर त्या घरावर जे टाळं लागेल मग ते कसं उघडणार आपण? त्या टाळ्यापेक्षा आताचं टाळं चांगलं आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.