“करोना संकटामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. आपण करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहे. चीननं १५ दिवसांमध्ये त्यांच्याकडे रुग्णालय उभारलं याचं सर्वांना कौतुक आहे. पण मुंबईत १७ दिवसांत फिल्ड हॉस्पीटल उभारलं हे कौतुकास्पद नाही का?,” असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य केलं.

“केंद्र सरकारनं लॉकडाउन जाहीर करण्यापूर्वीपासून आपण खबरदारी घेत होतो. माझं कुटुंब माझी जबाबदारी ही एकट्यादुकट्याचं काम नव्हतं. सर्वजण त्यात उतरले. तेव्हा आपण यावर मात करण्यास यशस्वी ठरताना दिसत आहोत. पाश्चिमात्य देशात करोनाचं संकट वाढत आहे. आपण राज्यात टास्क फोर्स निर्माण केली आहे. टास्क फोर्स निर्माण करणारं महाराष्ट्र हे पहिलं राष्ट्र आहे. धारावी मॉडेलचं जगभरातून कौतुक करण्यात आलं आहे. राज्यातील करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा आपण लपवला नाही. म्हणूनच तो कदाचित इतर राज्यांच्या आकड्यांपेक्षा अधिक असेल,” असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

सरकार पाडण्याचा मुहुर्त पाहणारे आता…
मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं आणि अहवाल वाचू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. “मराठा समाजाचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्काही लागू देणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे,” असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.