मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सात मार्च रोजी अयोध्येला जाणार आहेत. यावेळी ते रामलल्लाचे दर्शन घेतील, त्याचप्रमाणे शरयू नदीतीरावर आरती करतील अशी माहितीही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर दिली आहे. यावेळी हजारो शिवसैनिकही अयोध्येत जातील, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

२४ नोव्हेंबर २०१८ रोजी आपल्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारा त्यांचा प्रस्तावित दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.