दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मला वडिलांच्या ठिकाणी होते. तेही मला मुलगी मानत. युती आम्ही तोडलीच नाही. शिवसेनेला आम्हाला बाहेर काढायचे असते, तर अनंत गिते यांनाही हुडासिंगसारखे मंत्रिपदावरून दूर केले असते, असे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी येथे सांगितले. जागावाटपाच्या वेळी शिवसेनेने धमक्या दिल्यामुळेच युती तुटल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
भारतीय जनता पक्षाचे नगर शहर मतदारसंघातील उमेदवार अभय आगरकर यांच्या प्रचारासाठी उमा भारती यांची रविवारी सावेडीत सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्या बोलत होत्या. आगरकर यांच्यासह खासदार दिलीप गांधी, सुनील रामदासी, दामोदर बठेजा, अनंत जोशी, गीता गिल्डा, संगीता खरमाळे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
उमा भारती म्हणाल्या, महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये निवडून येण्याची पात्रताच नाही. राष्ट्रवादी हा भ्रष्टाचारवादी पक्ष आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी येथे केली. या दोघांची ही अवस्था लक्षात घेऊन जनतेने भारतीय जनता पक्षालाच पूर्ण बहुमतात सत्ता द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकारने आता नद्याजोड प्रकल्प हाती घेतला असून यात ३० लिंक जोडण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील सिंचनाचे सर्व प्रश्न सुटतील, असा विश्वास उमा भारती यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्रातील जनतेने भाजपला पूर्ण बहुमतात सत्ता द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
कृती आराखडय़ात निळवंडे प्रकल्प
शिर्डी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेंद्र गोंदकर यांच्या प्रचारासाठी शिर्डी येथेही उमा भारती यांची सभा झाली. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात जलसंपदा विभागात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार असल्याने धरणांची व कालव्यांची कामे पूर्ण होण्यास तीस ते चाळीस वर्षांचा कालावधी लागला. ही कामे पूर्ण करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात नगर जिल्हय़ातील निळवंडे धरणाच्या कालव्यांचाही समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.