सदोष, जीर्ण टाक्यांमुळे किनारपट्टीवरील गावांना टंचाईची झळ

नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू : डहाणू तालुक्यातील २६ गावे आणि पालघर तालुक्यातील ३ गावे आणि चार पाडय़ांसाठी असलेल्या महत्त्वाकांक्षी नळपाणी योजनेतील जलकुंभ जीर्ण आणि निकामी झाल्याने टाकीत पाणीच भरत नसल्याने या योजनेवर अवलंबून किनारपट्टीवरील अनेक गाव आणि पाडय़ांतील रहिवाशांची पाण्यासाठी फरफट सुरूच आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नूतनीकरणासाठी खर्च केलेले ६२ कोटी रुपये कुठे गेले, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.

ज्या गावाच्या नावाने पाणी योजनेला नाव देण्यात आले त्या बाडा पोखरण गावातील पाण्याची टाकी निकामी झाली आहे. जलवाहिनी जुन्या झाल्याने त्या जागोजागी फुटल्या आहेत. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

तारापूरमधील पाण्याची टाकी आतून जीर्ण झाली आहे. गेले कित्येक दिवस टाकीत पाणी भरलेच जात नसल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केली.

योजनेअंतर्गत साखरे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, २००६ पासून बाडा पोखरण योजनेची जलवाहिन्या, जलकुंभ जीर्ण झाले आहेत. आमदार आनंद ठाकूर, तसेच माजी आ. राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नातून योजनेचे नूतनीकरण करण्यात आले. जागतिक बँकेकडून अर्थसाह्य़ घेऊन ४९ कोटी रुपयांची योजना ६२ कोटीपर्यंत वाढविण्यात आली. या योजनेला सहा वेळा मुदतवाढ देऊनसुद्धा आर. ए. घुले या ठेकेदाराने बाडा पोखरण नळपाणी योजना सदोषच ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील गावांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत.

किनारपट्टीवरील गावांना दहा दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ठेकेदाराविरुद्ध कोणतीही कारवाई न करता योजना हस्तांतरणाचा घाट रचला होता. मात्र, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी विरोध दर्शविल्यानंतर तो निर्णय रद्द करण्यात आला.

बाडा पोखरण नळपाणी योजनेतून ३३ जलकुंभ बांधण्यात आले आहेत. मात्र, टाक्यांची बांधकामे सदोष असल्याने आजवर जलकुंभात पाणी साठविले जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

बाडा पोखरण नळपाणी योजनेतील अनेक कामे अपूर्ण आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १०० टक्के कामे पूर्ण करावीत.

-वशिदास अंभिरे, पंचायत समिती सदस्य