गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात १५ जूनपासून होणार असून, अभ्यासक्रम व विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी विद्यापीठाने आपल्या संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांच्या प्रमुखांची सभा शुक्रवारी (दि.१२) सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे. ही सभा webex meet App या प्लॅटफार्मवर होणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शैक्षणिक संस्था बंद असून, शासनाच्या निर्देशानुसार महाविद्यालयांचे द्वितीय, तृतीय व पुढील वर्षांचे अभ्यासक्रम १ ऑगस्ट २०२०, तर प्रथम वर्षाचे अभ्यासक्रम १ सप्टेंबर २०२० पासून सुरु होणार आहेत. गोंडवाना विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र १५ जूनपासून सुरु होणार आहे. यासंदर्भात कुलपतींनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन प्रवेश नोंदवण्याचे आवाहन केले आहे. यापार्श्वभूमीवर विद्यापीठाने विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व विद्यापीठाच्या विभागप्रमुखांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत तंत्रज्ञान प्लॅटफार्मची निर्मिती, अध्यापनशास्त्राची मार्गदर्शक तत्त्वे, आकर्षक व रंजक शैक्षणिक व्हिडीओ, स्वतंत्र व तत्सम प्लॅटफार्मवरील शैक्षणिक साहित्य सद्य:स्थितीतील अभ्यासक्रमांशी मॅपिंग करणे आणि त्यांचा विद्यार्थ्यांना क्रेडीटसाठी लाभ करुन देणे या व इतर बाबींवर चर्चा करुन आराखडा तयार करण्यात येणार आहे. शिवाय आचार्य पदवीकरीता ऑनलाइन मौखिक परीक्षा घेणे, विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविणे, संलग्नीकरण यावरही सभेत मंथन होणार आहे. या सभेत सर्व प्राचार्य व विद्यापीठाच्या विभागप्रमुखांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी केले आहे.