शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीच्या पुढील बैठकीत निर्णय

पुणे : इयत्ता दहावीला भाषा आणि समाजशास्त्र विषयासाठी अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीचा प्राथमिक स्तरावर सकारात्मक प्रतिसाद आहे. या संदर्भात आणखी एक बैठक घेऊन अंतिम निर्णय होणार आहे.

राज्य मंडळाने गेल्या वर्षी गणित आणि विज्ञान वगळता अन्य विषयांसाठीचे अंतर्गत गुण बंद केले. त्याचा परिणाम म्हणजे दहावीचा निकाल १२.३१ टक्क्य़ांनी घटला. अंतर्गत गुण बंद केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनाही फटका बसला.

राज्यातील ९० ते ९५ टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटली. तसेच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत नामांकित महाविद्यालयात राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांपेक्षा सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळण्याच्या चर्चेने पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यानंतर अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

त्यानुसार शिक्षण विभागाने अन्य मंडळांच्या मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करून राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेतील मूल्यमापनासंदर्भात समिती नेमली. या समितीला दहा दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. समितीने पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ या सर्वाकडून सूचना मागवल्या.

या पाश्र्वभूमीवर या समितीची बैठक गुरुवारी पुण्यात झाली.

‘बैठकीत विविध विषयांबाबत आणि अंतर्गत गुणांबाबत सविस्तर चर्चा झाली. समितीच्या सदस्यांनी त्यांचे म्हणणे मांडले. समितीतील सदस्यांचा कल विद्यार्थ्यांचे हित जपण्याकडे होता. मात्र एका बैठकीत अहवाल तयार करणे शक्य नसल्याने लवकरच या समितीची आणखी एक बैठक होईल. त्यात अंतिम अहवाल तयार करून तो राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवून पुढील निर्णय घेतला जाईल,’ अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.