करोना रोगाचा फैलाव रोखण्यासाठी आजपासून (१ जुलै ) रत्नगिरी जिल्ह्यात पुन्हा एकवार संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

आगामी एक आठवडा, म्हणजे ८ जुलैपर्यंत असलेल्या या टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा किंवा वैद्य्कीय गरजेव्यतिरिक्त सर्व व्यक्तींना घरातून बाहेर पडण्यास सक्त मनाई आहे . स्वाभाविकच  सर्व प्रकारची प्रवासी वाहतुक, दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहने बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने  किंवा आस्थापना वगळून अन्य सर्व दुकाने आणि आस्थापना बंद राहणार आहेत .

सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमा होता येणार नाही. त्याचबरोबर, कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रवास करतेवेळी मास्कचा वापर बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास किमान ६ फूट शारीरिक अंतर ठेवणेही आवश्यक आहे.

या टाळेबंदीच्या काळात जिल्ह्याच्या पाच सीमा सील करण्यात येणार असून आंबा घाट, कुंभार्ली घाट, कशेडी, हातीवले आणि म्हाप्रळ या ठिकाणी पोलिस पथके नेमण्यात आली आहेत. गेल्या तीन महिन्यांचा अनुभव लक्षात घेता, या ठिकाणी दोन पथके तैनात केली जाणार आहेत. मुंबईकडून येणाऱ्यांना कशेडीआधी एक किलोमीटर अंतरावर एक पथक राहणार आहे. हे पथक विनापास येणाऱ्या वाहनधारकांना परत पाठवण्यासाठी असून दुसरे पथक प्रवेश परवान्याची तपासणी करून वाहनधारकांना प्रवेश देण्यासाठी आहे.

गर्दी टाळण्यासाठी पोलिस यंत्रणेने हा आराखडा केला आहे.

दरम्यान जिल्ह्य़ात सोमवारी सायंकाळपासून एकूण १९ करोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. त्यापैकी एकटय़ा दापोली तालुक्यातील १६ रूग्ण असून या तालुक्यामध्येही आडे गावात सर्वांत जास्त १० करोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. उरलेले ३ रूग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत. त्यामुळे गेल्या मार्च महिन्यापासून आजअखेर रूग्णांची संख्या ५९९ झाली आहे. मंगळवारी २ रुग्णांना घरी सोडण्यात आल्यामुळे बरे झालेल्या  रुग्णांची संख्या ४३९ झाली आहे.

हर्णे बाजार पेठ येथील एका ६८ वर्षीय रुग्णाचा उपचार चालू असताना मृत्यू झाल्यामुळे या महामारीमुळे जिल्ह्यातील मृत्युमुखी पडलेल्या रोग्यांची संख्या २६ झाली आहे, तर १३४ रूग्णांवर उपचार चालू आहेत.