लातुरातील एका शिकवणी चालकाचे अपहरण करून त्याच्याकडे तब्बल २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी काँग्रेसच्या एका नगरसेवकास गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. याप्रकरणात अन्य एक नगरसेवक व चौघे फरार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच अविनाश चव्हाण या शिकवणी चालकाचा खून झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा खंडणीचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे मराठवाडय़ातील शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूरमधील शैक्षणिक वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

एका परप्रांतीय शिकवणी चालकास १० डिसेंबर रोजी काँग्रेसचे नगरसेवक सचिन म्हस्के, पुनित पाटील, व्ही. एस. पँथरचे अध्यक्ष विनोद खटके व अन्य तिघांनी बोलावून घेऊन गाडीत कोंबले व शहराबाहेर नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. शिवकणी वर्ग चालवण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. मारहाण झाल्यानंतर संबंधित प्राध्यापकाला खंडणीखोरांनी याची कुठे वाच्यता केली किंवा पोलिसांना सांगितले तर तुला व तुझ्या कुटुंबीयांना संपवून टाकू, अशी धमकी दिली. यामुळे शिकवणी चालक घाबरले. त्यानंतर धाडसाने त्यांनी शहर पोलीस उपाधीक्षक सचिन सांगळे यांची भेट घेतली व त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

यापूर्वी ६ लाख ६६ हजार रुपये आपण दिले असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन सांगळे यांनी संबंधित प्राध्यापकाला दिलासा दिला व त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा नगरसेवक सचिन अशोक म्हस्के यास अटक केली. नगरसेवक पुनित पाटील, व्ही. एस. पँथरचे अध्यक्ष विनोद खटके व इतर तिघे मात्र फरार आहेत. पोलीस अधीक्षक व अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी खंडणीचे प्रकरण उघडकीस आणले आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाणार असल्याचे सांगितले. लातूर शहरात खंडणीखोर असल्याचे व त्यांच्यापासून त्रास होत असल्याची चर्चा होती मात्र कोणी पोलिसात तक्रार करण्याचे धाडस दाखवले नव्हते. परप्रांतीय प्राध्यापकाने हे धाडस दाखवले असल्याने आता आणखीन काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता बळावली आहे.

काँग्रेस पक्षाची अडचण
२५ लाख रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात थेट काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक झाली. त्यामुळे आता आगामी काळात हे प्रकरण काँग्रेसच्या मंडळींवर शेकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिकवणीचालक भयभीत
लातूर शहरात खासगी शिकवण्यांचे शहरात मोठे पेव असून स्थानिक लोकांबरोबरच आता परप्रांतीय प्राध्यापकही येथे खासगी शिवकणीवर्ग घेतात व त्यांची कोटय़वधींची कमाई आहे. अविनाश चव्हाण या शिकवणी वर्गचालकाचा याच प्रकारातून खून झाला होता. त्यानंतर शिकवणी वर्गचालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शिकवणी वर्गाच्या परिसरात हाणामाऱ्या, छेडछाडीचे प्रकार व लुटीचे प्रकारही घडत असल्यामुळे तेथे आता रीतसर पोलीस चौकी सुरू करण्यात आली असून ५२ उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.