अभिनेत्री कंगना रणौत प्रकरण सध्या राज्यात चांगलंच गाजताना दिसत आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणापासून आक्रमक झालेल्या कंगनानं मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी आपत्तीजनक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हा वाद कंगना विरुद्ध शिवसेना असा झाला. यात कंगनाच्या कार्यालयाचा अनधिकृत भाग महापालिकेनं पाडल्यानंतर कंगनानं संताप व्यक्त केला होता. त्यानंतर हा वाद चिघळला असून, यावर काँग्रेसच्या नेत्यानं कंगनाला समज दिली आहे.

कंगनाच्या कार्यालयाचा अनधिकृत भाग महापालिकेनं काल (९ सप्टेंबर) पाडला. यावरून संतापलेल्या कंगनानं या कारवाईचा फोटो शेअर करत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली होती. कंगनाच्या या ट्विटला काँग्रेसचे नेते आमदार भाई जगताप यांनी उत्तर दिलं.

“आपण एकदा चुकल्यास, आम्ही आपल्याला चेतावणी देऊ. आपण पुन्हा चुकल्यास, आम्ही आपले मार्गदर्शन करू. आपण परत परत चुकल्यास, क्षमेची अपेक्षा करू नका. जय हिंद… जय महाराष्ट्र,” अशा शब्दात भाई जगताप यांनी कंगनाला समज दिली.

मुंबई बृह्नमहापालिकेनं बुधवारी (९ सप्टेंबर) कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत काम पाडलं. यावरून कंगनानं संतापही व्यक्त केला होता. महापालिकेच्या कारवाईविरोधात कंगनानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानं कारवाईला स्थगिती दिल्यानंतर महापालिकेनं कारवाई थांबवली होती. मात्र, यावरून चर्चा पेटली आहे.

‘या’ ट्विटमुळे पडली वादाची ठिणगी

राम कदम यांच्या ट्विटवर बोलताना कंगनानं हे ट्विट केलं होतं. “सर…माझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण खरंतर मला आता मुव्ही माफिया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय…त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज…”अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनी कंगनावर टीका केली. राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना कंगनानं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली होती.